‘एक पित्याचं दु:ख..’ मुलाच्या भेटीसाठी शिखर धवनची तळमळ पाहून अक्षय कुमारने लिहिली पोस्ट
क्रिकेटर शिखर धवनने मुलाच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुलाला भेटू न शकल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं होतं. त्यावर आता अभिनेता अक्षय कुमारने पोस्ट लिहिली आहे. एका पित्याचं दु:ख मी समजू शकतो, असं तो म्हणाला.
मुंबई : 29 डिसेंबर 2023 | भारतीय क्रिकेटर शिखर धवन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीसोबतचा घटस्फोट आणि वाद जगजाहीर आहे. अशातच त्याने मुलगा झोरावरला भेटू न शकल्याचं दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिखर धवनने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने मुलाला बऱ्याच दिवसांपासून भेटलो नसल्याचा उल्लेख केला होता. आता अभिनेता अक्षय कुमारने शिखरसाठी खास पोस्ट लिहिली आहे. लाखो लोक तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी प्रार्थना करतायत, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
अक्षय कुमारने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिखर धवन आणि त्याच्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्याने लिहिलंय, ‘ही पोस्ट पाहिल्यानंतर मी खरंच खूप भावूक झालो. एक पिता असल्याने मला ही गोष्ट नीट ठाऊक आहे की तुमच्या मुलाला भेटू आणि पाहू न शकल्याचं दु:ख कोणत्याही दु:खापेक्षा मोठं असतं. धैर्य ठेव शिखर. आम्ही लाखो लोक तुझी तुझ्या मुलाशी भेट व्हावी यासाठी प्रार्थना करतोय. गॉड ब्लेस.’
पत्नी आयेशाशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने शिखरला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केलंय. त्याचप्रमाणे शिखर त्याच्या मुलाला भेटू आणि पाहू शकत नाहीये. “तुला समोर बघून आता एक वर्ष झालं आहे आणि गेल्या तीन महिन्यांपासून मला प्रत्येक ठिकाणाहून ब्लॉग केलं जात आहे. यासाठी मी तुला बर्थडे विश करण्यासाठी तोच फोटो वापरत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुला थेट भेटू शकत नाही पण टेलीपेथीच्या माध्यमातून मी तुझ्याशी जोडलो गेलो आहे. मला तुझा अभिमान आहे आणि मला माहिती आहे की तू नक्कीच चांगलं करत असशील. नक्कीच तू पुढे जात असशील”, असं त्याने लिहिलं होतं.
शिखर धवनने आयेशा मुखर्जी हिच्याशी 2012 मध्ये लग्न केलं होतं. आयशाचं पहिलं लग्न ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी झालं होतं. त्यांना आलिया आणि रिया या दोन मुली आहेत. त्या मुलींना स्वीकारत शिखरने आयशासोबत लग्न केलं होतं. आयेशा आणि शिखर यांना झोरावर हा मुलगा आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी आयेशा आणि शिखरचा घटस्फोट झाला. पण मुलाच्या कस्टडीबाबत कोर्टाने निर्णय दिला नव्हता.