Akshay Kumar | ओह माय गदर.. सनी देओलच्या तुफानमुळे अक्षय कुमारसुद्धा हैराण; अखेर सोडलं मौन
'अक्षयचं मन खूप मोठं आहे, दोन्ही चित्रपटांचं कौतुक करतोय', असं एकाने लिहिलं आहे. तर दोन्ही चित्रपटांना पाठिंबा दिल्याने अनेकांनी अक्षयची स्तुती केली आहे. 'बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला दोन चांगले चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद', असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ आणि सनी देओलचा ‘गदर 2’ हे दोन चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांची टक्कर झाली आणि त्यात ‘गदर 2’ने बाजी मारली. एकीकडे देशभरात ‘गदर 2’ची तुफान क्रेझ पहायला मिळत असतानाच दुसरीकडे ‘OMG 2’लाही प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 79.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘गदर 2’ने जवळपास 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांमुळे बॉलिवूडला अच्छे दिन आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. यानिमित्ताने अक्षय कुमारनेही सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने ‘गदर 2’च्या यशाचंही आपल्या अंदाजात कौतुक केलं आहे. अक्षयचा हा व्हिडीओ आणि त्यावर लिहिलेला संदेश नेटकऱ्यांना खूपच पसंत पडला आहे.
अक्षयने त्याच्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातील काही दृश्ये आणि त्यावर समिक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओत त्याच्या आवाजातील ‘घर आजा परदेसी’ हे ‘गदर 2’मधील गाणं ऐकायला मिळत आहे. या व्हिडीओच्या अखेरीस पंकज त्रिपाठी आणि अक्षय यांच्यामधील चित्रपटातील एक संवाद दाखवला आहे. “तुम्ही कधी विचार केला का, की हे तुम्ही ज्या तत्वज्ञानाच्या गोष्टी, त्या लोकांना समजतं की नाही”, असा सवाल पंकज त्रिपाठी अक्षयला करतात. त्यावर अक्षय म्हणतो, “मला जेव्हा एखाद्याला काही समजवायचं असतं ना, तेव्हा तो समजून जातो.”
View this post on Instagram
‘ओह माय गदरला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आठवडा दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. प्रेम आणि आभार’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. ‘ओह माय गॉड’ आणि ‘गदर’ अशा दोन्ही चित्रपटांची नावं एकत्र करून त्याने ‘ओह माय गदर’ असं म्हटलंय. अक्षयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘अक्षयचं मन खूप मोठं आहे, दोन्ही चित्रपटांचं कौतुक करतोय’, असं एकाने लिहिलं आहे. तर दोन्ही चित्रपटांना पाठिंबा दिल्याने अनेकांनी अक्षयची स्तुती केली आहे. ‘बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला दोन चांगले चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.