Alia Bhatt | आलिया भट्टने सांगितलं मुलगी राहाचे फोटो न दाखवण्यामागचं खरं कारण; म्हणाली..
मुलीचं संगोपन आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत होत असल्याचंही आलियाने यावेळी मान्य केलं. "एक आई म्हणून मी कुठेतरी कमी पडत असल्याची भावना सतत माझ्या मनात येते," असं ती म्हणाली.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या आयुष्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. राहा असं त्यांनी या चिमुकल्या पाहुणीचं नाव ठेवलं. राहाच्या जन्मापासून दोघांनी तिच्या फोटोंबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला. तिचे फोटो कुठेच पोस्ट करायचे नाहीत किंवा पापाराझींना क्लिक करू द्यायचे नाहीत, असा त्यांचा आग्रह आहे. राहाचा चेहरा अद्याप कोणाला दाखवायचना नाही, असा निर्णय रणबीर आणि आलियाने घेतला आहे. या निर्णयाबाबत आलिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने राहाचा चेहरा न दाखवण्यामागचं कारण सांगितलं.
“माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं आलिया म्हणाली.
मुलीचं संगोपन आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत होत असल्याचंही आलियाने यावेळी मान्य केलं. “एक आई म्हणून मी कुठेतरी कमी पडत असल्याची भावना सतत माझ्या मनात येते. मी माझ्या मुलीचं संगोपन आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडतेय का, याचा विचार करून मला चिंता वाटते. महिलांवर दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडण्याचा मोठा दबाव असतो. इतकंच नव्हे तर लोक आजही असा विचार करतात की आई झाल्यावर तुम्हाला तुमच्या करिअरशी तडजोड करावी लागते. कारण तुम्ही आता एक मॉडेल नाही तर आई आहात”, असं आलिया म्हणाली.
View this post on Instagram
आईच्या जबाबदारीविषयी ती पुढे म्हणते, “आताच्या काळात एका आईसाठीची आव्हानं आणखी वाढली आहेत. लोक काय विचार करतात, याचा मीसुद्धा विचार करते. मी सगळं चांगल्याप्रकारे सांभाळतेय की नाही, याबद्दल त्यांना काय वाटत असेल? जर समाजात जजमेंट नसेल तर तुम्ही स्वत:ला खूप चांगल्याप्रकारे हाताळू शकता. मी सध्या माझ्या मानसिक आरोग्यावर अधिक भर देत आहे. दर आठवड्याला मी थेरेपीला जाते. त्याठिकाणी मी अशा भीतींविषयी मोकळेपणे बोलते. थेरेपीमुळे मला लढण्याची ताकद मिळतेय.”