पुन्हा एकदा भीतीचा थरार घडणार; ‘अल्याड पल्याड’च्या घवघवीत यशानंतर सीक्वेलची घोषणा
'अल्याड पल्याड' या चित्रपटाच्या यशानंतर आता सीक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. आता या सीक्वेलविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’वर भरभरून प्रेम केलं. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी ‘अल्याड पल्याड 2’ची घोषणा केली आहे. नुकतंय या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात भयासोबत विनोदाचीही किनार होती. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन, अनुष्का पिंपुटकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.
कोकणातल्या गावपळण या प्रथेला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा रचण्यात आली. कोकणात मालवणमधील काही गावांमध्ये गावपळण ही प्रथा पाळली जाते. दर तीन-चार वर्षांनी देवाचा कौल घेऊन सगळे गावकरी आपापले खाण्या-पिण्याचे सामान, कपडे, घरातली पाळलेली जनावरं हे सगळं घेऊन तीन दिवस गावच्या वेशीबाहेर जातात. तीन दिवस एकत्र बाहेर राहणं, एकत्रित जेवण, मनोरंजन असा सगळा माहौल अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा देवाचा कौल घेऊन मंडळी गावात परत जातात. या तीन दिवसांत गावात कोणीही थांबत नाहीत. या प्रथेमागे अर्थातच भुतांचं वास्तव्य आणि देवाने त्यांचा बंदोबस्त केल्याची कथा आहे. तर या गावपळण संकल्पनेच्या अनुषंगानेच ‘अल्याड पल्याड’ची कथा घडते.
View this post on Instagram
‘अल्याड पल्याड’ या पहिल्या भागाच्या सुरुवातीलाच गावचे सरपंच आणि मुख्य पुजारी सगळ्या गावकऱ्यांना सामान आवरून अमुक एका मुहूर्तावर गावाबाहेर जायचं असल्याची कल्पना देत असतात. ही प्रथा कैक वर्ष पिढ्यानपिढ्या पाळजी जात असली तरी खरोखरच भूत-आत्मा या संकल्पना खऱ्या आहेत का? या तीन दिवसांत गावात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू ओढावतो का? अशा शंका-कुशंका काहींच्या मनात येत असतात. तर अशाच पद्धतीने भूत वगैरे काही नसतं असं मानणारी चार तरुण मंडळी संपूर्ण गाव वेशीबाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा गावात परततात. गावात परतल्यानंतर एका रात्रीत त्यांच्याबरोबर घडणारा भयभुतांचा खेळ ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून पहायला मिळाला.