Pathaan: ‘पठाण’ वादादरम्यान शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल; “जर मी हिंदू असतो तर..”
शाहरुख खान हिंदू असता, तर नाव शेखर राधा कृष्ण असतं? किंग खानने दिलं उत्तर
मुंबई: शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दीपिका पदुकोणने या गाण्यातील एका दृश्यात भगवी बिकिनी घालून सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप केला जात आहे. काही हिंदू संघटनांनी या चित्रपटाला आणि गाण्याला तीव्र विरोध केला आहे. तर पठाण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी होतेय. या वादादरम्यान आता शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो धर्माबद्दल बोलताना दिसतोय.
जर शाहरुख हिंदू असता तर..
शाहरुखचा हा व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीतला आहे. या मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की जर तो हिंदू असता तर त्याचं नाव दुसरं काहीतरी असतं, तेव्हा त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी वेगळ्या असत्या का? “तू एक चांगला मुस्लीम आहेस. पण जर तुझं नाव एसके वरून शेखर कृष्ण असतं तर..” यावर शाहरुख मध्येच बोलतो की, “शेखर कृष्ण नाही .. एसआरके म्हणजे शेखर राधा कृष्ण”. या उत्तराने शाहरुख उपस्थितांची मनं जिंकतो.
शाहरुखने सांगितलं की जर जो हिंदू असता, त्याचं नाव शेखर राधा कृष्ण असतं, तरीसुद्धा तो तसाच असता जसा आता आहे. त्याच्यासाठी कोणत्याच गोष्टी बदलल्या नसत्या. “मला नाही वाटत की काही वेगळं असतं. मला असं वाटतं की एखाद्या कलाकारामध्ये ती क्षमता असते की तो कोणत्या समुदायाचा आहे किंवा कोणत्या सेक्टरचा आहे, याने त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही त्यांच्या कलेला पसंत किंवा नापसंत करता. तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारली तरी मी इतकाच गोड वागलो असतो”, असं शाहरुख पुढे म्हणतो.
‘पठाण’ चित्रपटावरील वादादरम्यान शाहरुखचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.