छातीवर पट्टी बांधून होलिका दहनमध्ये सहभागी झाले अमिताभ बच्चन; दिले तब्येतीचे अपडेट्स
'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. त्यांच्या बरगड्यांना मार लागला. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमधून चाहत्यांना तब्येतीविषयी माहिती दिली आहे.
मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांना शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचं कळताच देशभरातील चाहत्यांकडून काळजी व्यक्त होत आहे. हैदराबादमध्ये आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींना दुखापत झाली. यावेळी त्यांच्या बरगड्यांना मार लागला. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारानंतर ते मुंबईतल्या निवासस्थानी परतले आहेत. आपल्या ब्लॉगमधून त्यांनी तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. सोमवारी बिग बींनी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्यावर होलिका दहन केलं. त्याचप्रमाणे चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘होलिका दहनच्या तारखेवरून सुरू असलेल्या संभ्रमादरम्यान आम्ही सोमवारी जलसा बंगल्यावर होलिका दहन केलं. होळी आज आणि उद्या साजरी केली जाईल. या संभ्रमात मी ते केलं जे करायला पाहिजे नव्हतं. मी सध्या जास्तीत जास्त आराम करतोय. मात्र माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.’
तब्येतीचे अपडेट्स
या ब्लॉगमध्ये बिग बींनी त्यांच्या तब्येतीचेही अपडेट्स दिले आहेत. ‘सर्वांत आधी.. माझ्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांचे, माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी आभार मानतो. मी हळूहळू ठीक होतोय. पूर्णपणे बरं व्हायला अजून थोडा काळ लागेल. पण डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी काटेकोरपणे ऐकतोय आणि त्यांचं पालन करतोय. माझ्या छातीवर पट्टी बांधलेली आहे आणि मी आराम करतोय. जोपर्यंत डॉक्टरांकडून आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सर्व कामं बंद आहेत’
याआधी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी दुखापतीची माहिती दिली होती. हालचाली करताना आणि श्वास घेताना वेदना होत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे सर्व कामं पुढे ढकलण्यात आली आहेत. सध्या ते जलसा या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामांसाठी थोडीफार हालचाल करू शकतोय, असंही त्यांनी नमूद केलंय. हे सर्व सांगताना त्यांनी बंगल्याबाहेर भेटीला येणाऱ्या चाहत्यांची खास माफी मागितली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना मोठी दुखापत झाली आहे. बरगड्यांमधील स्नायूंनाही मार लागला आहे. त्यामुळे त्यांना बरं होण्यासाठी थोडा काळ लागणार आहे. त्यांच्या या ब्लॉगनंतर सोशल मीडियावर चाहते बिग बींच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.