‘कदाचित ते दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत’; दुखापतग्रस्त अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन दुखापतग्रस्त झाले. त्यांच्या बरगड्यांना मार लागला. अशातच आपल्या ब्लॉगमध्ये बिग बींनी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई : ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. बिग बींच्या बरगड्यांना मार लागला असून त्यांना बरं होण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. या दुखापतीमुळे त्यांना धूळवड नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात साजरी करण्यात आली नाही. आपल्या ब्लॉगमध्ये ते तब्येतीचे अपडेट्स देत आहेत. मात्र नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी होळीच्या आठवणींना उजाळा दिला. जुने दिवस आठवत असतानाच त्यांनी बदललेल्या परिस्थितीविषयी आणि धूळवडीत सहभाग घेता आला नाही याविषयी नाराजी व्यक्त केली.
अमिताभ बच्चन यांना आता पहिल्यासारखी धूळवड साजरी करता येत नसल्याची खंत त्यांच्या या ब्लॉगमधून स्पष्ट जाणवली. तब्येतीचे अपडेट्स देताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा त्यांच्या बंगल्यावर धूमधडाक्यात होळी साजरी केली जायची.
‘घरातील सुस्त माहौल आणि शारीरिक हालचालींवरील बंधनांदरम्यान होळीच्या उत्सवात सहभागी होण्यास असमर्थ होतो. होळी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जायची. ते सर्व आता कुठेतरी हरवलंय आणि असं गेल्या काही वर्षांपासून होतंय. होळीचा जल्लोष साजरा करण्यासाठी आधी घर सर्वांसाठी खुलं असायचं. उत्हासात सर्वांचं स्वागत केलं जायचं. म्युझिक, डान्स आणि पाहुण्यांची रेलचेल… सकाळपासून सुरू झालेली आणि कधीच न संपणारी धमाल-मस्ती असायची’, असं त्यांनी लिहिलंय.
या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘कदाचित ती वेळ आता पुन्हा कधीच येणार नाही. मात्र मला आशा आहे की ते दिवस परत येतील. मात्र सध्यासाठी तरी ते कठीण वाटतंय.’
याआधीच्या ब्लॉगमध्ये बिग बींनी त्यांच्या तब्येतीचेही अपडेट्स दिले होते. ‘सर्वांत आधी.. माझ्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांचे, माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी आभार मानतो. मी हळूहळू ठीक होतोय. पूर्णपणे बरं व्हायला अजून थोडा काळ लागेल. पण डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी काटेकोरपणे ऐकतोय आणि त्यांचं पालन करतोय. माझ्या छातीवर पट्टी बांधलेली आहे आणि मी आराम करतोय. जोपर्यंत डॉक्टरांकडून आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सर्व कामं बंद आहेत’, असं त्यांनी लिहिलं होतं.
हैदराबादमध्ये आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींना दुखापत झाली. यावेळी त्यांच्या बरगड्यांना मार लागला. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारानंतर ते मुंबईतल्या निवासस्थानी परतले आहेत.