‘ॲनिमल’मधील रश्मिकाच्या भूमिकेबद्दल अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत
अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या पहिल्याच हिंदी चित्रपटात तिला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आता तिचा 'ॲनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर बिग बींनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 10 डिसेंबर 2023 | सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स, गाणी यांबद्दल नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. प्रेक्षकांसोबतच विविध सेलिब्रिटींनीही यावर आपली मतं मांडली आहेत. काहींनी चित्रपटातील सीन्सवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे तर काहींना त्यातील कलाकारांचा अभिनय पसंतीस पडला आहे. आता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘ॲनिमल’मधील रश्मिकाच्या अभिनयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 15’च्या 85 व्या एपिसोडमध्ये रश्मिकाचा विषय निघाला, तेव्हा ते ‘ॲनिमल’ या चित्रपटाविषयीही व्यक्त झाले.
रश्मिकाचा मोठा चाहता
या एपिसोडमध्ये महाराष्ट्रातील नांदेड इथले प्रमोद भास्के हॉटसीटवर बसले होते. बिग बींसोबत ‘कौन बनेगा करोडपती’चा खेळ खेळत असताना मधे प्रमोद त्यांना म्हणतात, “सर, तुम्ही मला माझ्या छंदाविषयी विचारलं नाहीत?” त्यावर हसून बिग बी त्यांना विचारतात, “तुमचा छंद काय आहे?” याचं उत्तर देताना प्रमोद सांगतात, “मला संगीत ऐकायला आणि चित्रपट पहायला खूप आवडतं. खासकरून दाक्षिणात्य चित्रपट. मी रश्मिका मंदानाचा खूप मोठा चाहता आहे. माझ्यासारखा तिचा दुसरा कोणी चाहताच नसेल.”
प्रमोद रश्मिकाविषयी पुढे म्हणतात, “मी 2016 पासून तिचा खूप मोठा चाहता आहे. ‘किरिक पार्टी’ हा तिचा पहिला कन्नड चित्रपट त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच मला ती खूप आवडते. मी तुम्हाला एक खूप रंजक गोष्ट सांगतो. मला सोशल मीडियावर तिने तीन वेळा रिप्लायसुद्धा दिला आहे. इतकंच नव्हे तर ट्विटरवर मी तिला प्रपोजसुद्धा केलं होतं.” हे सर्व ऐकल्यानंतर बिग बी त्यांना विचारतात की, “तुम्ही इतक्यात तिच्याशी बोललात का?” त्यावर नकारार्थी उत्तर देत प्रमोद सांगतात की ती सध्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे.
बिग बींचा सल्ला
स्पर्धक प्रमोद यांची मस्करी करताना बिग बी पुढे त्यांना एक सल्ला देतात. ते म्हणतात, “तुम्ही एक काम करा. तुम्ही तिला मेसेज करा की, सॉरी रश्मिका, मी सुद्धा व्यग्र आहे. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी तुला मेसेज करेन. त्यानंतर काय होतं ते पहा. महिलांनो, मला माफ करा. मला चुकीचं समजू नका. पण महिलांना नकार खूप आवडतो.” याच खेळादरम्यान बिग बी हे प्रमोद यांना सरप्राईज देतात.
स्पर्धकाला सरप्राईज
“तुम्ही म्हणालात की रश्मिकाचे तुम्ही खूप मोठे चाहते आहात, मग तुम्ही कधी तिला भेटलात का”, असा प्रश्न ते प्रमोद यांना विचारतात. त्यावर प्रमोद म्हणतात, “नाही सर, मी कधीच तिला भेटलो नाही. पण मला एकदा तरी तिला भेटायचं आहे.” हे ऐकल्यानंतर बिग बी रश्मिकाला व्हिडीओ कॉल करतात. यावेळी रश्मिकाला पाहून प्रमोद खूप खुश होतात. “मलाही तुम्हाला एकदा तरी प्रत्यक्षात भेटायचं आहे. मी तुम्हाला पुढील खेळासाठी खूप शुभेच्छा देते. तुम्ही खूप चांगले खेळत आहात”, असं रश्मिका प्रमोद यांना म्हणते.
याच व्हिडीओ कॉलवर बिग बी रश्मिकाला तिच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाबद्दल बोलतात. “धन्यवाद रश्मिका. आम्ही तुझे चित्रपट पाहत असतो आणि तुझा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपटसुद्धा खूप चांगला आहे. ‘ॲनिमल’मधील तुझा परफॉर्मन्स खूपच आवडला”, अशा शब्दांत ते तिचं कौतुक करतात. त्यावर रश्मिकासुद्धा त्यांचे आभार मानते.