11 वर्षांनंतर अंकुश – स्वप्निल – सई एकत्र; पुन्हा टिकटिक वाजणार, धडधड वाढणार?
सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि अंकुश चौधरीचं त्रिकुट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. 'दुनियादारी' या चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर हे तिघं पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा संजय जाधव करणार आहेत.
जवळपास 11 वर्षांपूर्वी संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यातील कलाकार, त्यांचं दमदार अभिनय, ओठांवर रुळणारी गाणी आणि कथा हे सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यामध्ये अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी यांसह इतरही कलाकारांच्या भूमिका होत्या. आता 11 वर्षांनंतर अंकुश, स्वप्नील आणि सई पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत संजय जाधवही आहेत. मनात टिक टिक वाजवणारी आणि धडधड वाढवणारी ही टीम आता प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. ए. व्ही. के. पिक्चर्स, व्हिडीओ पॅलेस आणि मेटाडोर प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे.
या नव्या चित्रपटाची पूर्वतयारी सुरू झाली असून ही टीम प्रेक्षकांना 11 वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर याचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणाले, “संजय जाधव यांच्यासारख्या धमाकेदार दिग्दर्शकांसोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा 3’, ‘कलावती’ हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला आहे.”
View this post on Instagram
सई, स्वप्निल आणि अंकुश या त्रिकुटाला एकत्र पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं नाव काय असेल आणि त्यात इतर कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत, याविषयी माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सई, अंकुश आणि स्वप्निलचं हे त्रिकुट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा कमाल करणार, हे मात्र नक्की! दिग्दर्शक संजय जाधव यांनी आजवर दमदार चित्रपटांचं दिग्दर्शनक केलं. यात ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘खारी बिस्कीट’, ‘येरे येरे पैसा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.