अनुपम खेर यांनी सांगितलं भाड्याच्या घरात राहण्यामागचं कारण; कधीच खरेदी करणार नाही हक्काचं घर
अभिनेते अनुपम खेर हे आजही भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी कधीच घर विकत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे. या निर्णयाबाबत पत्नी किरण खेर यांची काय प्रतिक्रिया होती, त्याविषयीही अनुपम खेर यांनी सांगितलंय.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी खुलासा केला की त्यांच्या हक्काचं असं कोणतं घरच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाडेतत्त्वावर राहत आहेत. “मी भाड्याच्या घरात राहतो, कारण मी घर विकत न घेण्याचा निर्णय घेतला होता. कोणासाठी घर घेऊ? त्यापेक्षा दर महिन्याला भाडं भरा आणि राहा. ज्या पैशांनी तुम्ही घर खरेदी करता, तेच पैसे बँकेत ठेवा आणि घराचं भाडं भरण्यासाठी तेच पैसे वापरा”, असं खेर म्हणाले.
घर न घेण्यामागचं कारण पटवून देताना अनुपम खेर पुढे म्हणाले, “तुमच्या घरासाठी लोकं भांडण्यापेक्षा तुम्ही गेल्यानंतर पैसे वाटून दिलेलं बरं. मी माझ्या आईसाठी शिमल्यात एक घर घेतलंय. तेसुद्धा यासाठी कारण मी सात वर्षांपूर्वी तिला असंच मस्करीत म्हटलं होतं की मी खूप मोठा स्टार आहे, तुला काय हवं ते सांग. मला वाटलं ती म्हणेल, नको, काहीच नको. पण ती आग्रहाने म्हणाली की मला शिमल्यात घर हवंय. मी तिला कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, वडिलांच्या निधनानंतर तुम्ही तिथे राहत नाही, पण मी तिथे माझं संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात राहिले. म्हणून मला तिथे हक्काचं घर हवंय. आईला फक्त वन बेडरूमचं घर हवं होतं, पण तिला मी आठ बेडरुमचं घर बांधून दिलं.”
View this post on Instagram
घर न घेण्याच्या निर्णयाबाबत पत्नी किरण खेर यांचं मत काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं, “तिला हे स्वीकारण्यात थोडा वेळ लागला, पण आता ती ठीक आहे. चंदीगडमध्ये तिचं स्वत:चं एक घर आहे. मी रतन टाटा यांच्याकडून खूप प्रेरणा घेतो. तेसुद्धा एका छोट्याशा घरात राहायचे आणि फिरण्यासाठी एक छोटी कार वापरायचे.”
अनुपम खेर यांचा ‘विजय 69 ‘ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये त्यांच्यासोबत चंकी पांडे आणि मिहिर अहुजा यांच्याही भूमिका आहेत.