IND vs PAK: भारताच्या विजयानंतर अनुष्काकडून पती विराट कोहलीवर प्रेमाचा वर्षाव, पहा पोस्ट
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने विराटचा मैदानावरील एक फोटो शेअर केला आहे.

विराट कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा अशी अप्रतिम खेळी केल्याने भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकिस्तानर सहा गडी राखून मात केली. सलग दुसरा विजय मिळवल्याने भारताचं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं असून पाकिस्तानचा संघ गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुबई इथं झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला 241 धावांत रोखल्यानंतर भारताने 42.3 ओव्हरसमध्ये 4 बाद 244 धावा करत विजय साकारला. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीदरम्यान विराट कोहलीने एकदिवसीय कारकीर्दीत 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सोशल मीडियाद्वारे ‘किंग कोहली’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
अनुष्काने विराटचा मैदानावरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो कॅमेऱ्याकडे पाहून थंब्स अप करताना दिसत आहे. या फोटोवर तिने हात जोडतानाचा आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. अनुष्काची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटनेही मैदानावर विजय मिळवल्यानंतर लगेच अनुष्काला व्हिडीओ कॉल केला. पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आनंद त्याने अनुष्कासमोर व्यक्त केला. पत्नी आणि मुलांशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याचं विराटचं हे दृश्य अनेकदा मैदानावर पहायला मिळतं. विजय मिळवल्यानंतर आनंद शेअर करण्यासाठी तो आवर्जून पत्नीला व्हिडीओ कॉल करतो.
अनुष्का शर्माची पोस्ट-




पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक, आशिया चषक आणि चॅम्पियन्स करंडक या स्पर्धांमध्ये किमान एक शतक करणारा कोहली हा क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे. तसंच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्याची आता एकूण सहा शतकं झाली आहेत. शतकी खेळीदरम्यान कोहलीने एकदिवसीय कारकीर्दीत 14 हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला आहे. मात्र त्याने सर्वांत कमी सामन्यांमध्ये हा टप्पा ओलांडण्याचा विक्रम रचला आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सचिन तेंडुलकरने 350 डाव तर संगकाराने 378 डाव घेतले होते. विराटने केवळ 287 व्या एकदिवसीय डावात 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.