सर्वांसमोर बहिणीला मिठी मारत रडला अर्जुन कपूर; वडील बोनी कपूर म्हणाले..
अभिनेता अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो सर्वांसमोर बहीण अंशुलाला मिठी मारून रडताना दिसून येतोय. अर्जुनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मुंबई : 8 फेब्रुवारी 2024 | अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनी 2012 मध्ये आईला गमावलं होतं. अर्जुन आणि अंशुला ही प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलं आहेत. सोशल मीडियावर अनेकदा अर्जुन त्याच्या आईविषयी मोकळेपणे व्यक्त होताना दिसतो. त्याने काही पोस्टद्वारे आईच्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि अंशुलाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अर्जुन त्याच्या बहिणीला मिठी मारून रडताना दिसतोय.
एका कार्यक्रमात अंशुला काही तरुणांसमोर येऊन आईविषीय बोलताना दिसली. यावेळी अर्जुन तिचा व्हिडीओ शूट करत होता. अंशुला म्हणते, “तुला जे बनायचं आहे, जे करायचं आहे ते कर. ती नेहमी असं म्हणायची की आयुष्यात तू काहीही केलंस तरी त्यात आनंदी असशील याची खात्री करुन घे. तिचा आणि माझा आवाज ऐकल्याबद्दल धन्यवाद. रब राखा.” यानंतर अंशुला मंचावरून खाली येते आणि तेव्हा अर्जुन तिला मिठी मारून रडतो. अर्जुन आणि अंशुलाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आमची आई नेहमीच म्हणायची.. रब राबा’.
View this post on Instagram
हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर सर्वसामान्यांपासून बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्जुन आणि अंशुलाचे वडील बोनी कपूर यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, ‘बाळा, तुम्हा दोघांवर माझं खूप प्रेम आहे.’ अर्जुन आणि अंशुलाच्या सावत्र बहिणी म्हणजेच अभिनेत्री जान्हवी आणि खुशी कपूर यांनीसुद्धा हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय आयुषमान खुराना, बॉबी देओल, डायना पेंटी, अभिषेक बच्चन आणि इतर सेलिब्रिटींनीही कमेंट सेक्शनमध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.
कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर मार्च 2012 रोजी मोना कपूर यांचं निधन झालं होतं. अर्जुन कपूरचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट ‘इशकजादे’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच मोना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आपल्या मुलाचा पहिला चित्रपट पाहू शकल्या नव्हत्या.