घटस्फोटाबाबत बऱ्याच वर्षांनंतर अर्जुन रामपालने सोडलं मौन; म्हणाला “पुरुष हे मूर्खच…”
अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. अर्जुनने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट दिला होता. सध्या तो एका मॉडेलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
अभिनेता अर्जुन रामपालने 1998 मध्ये मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 21 वर्षांनंतर 2019 मध्ये हे दोघं विभक्त झाले. अर्जुन आणि मेहर यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने कमी वयात लग्न केल्याचा पश्चात्ताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर पूर्णपणे एकाकी पडल्याचंही त्याने सांगितलं. अर्जुन सध्या मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांनाही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही पूर्व पत्नीसोबत आता मैत्रीपूर्ण नातं असून तिचं आणि मुलींचं गॅब्रिएलाशी चांगलं जमतं, असंही तो म्हणाला.
‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट मुलाखतीत अर्जुन त्याच्या घटस्फोटाबद्दल म्हणाला, “आपली चूक दुसऱ्यावर ढकलणं आणि कारणं देणं हा मानवी स्वभावच आहे. पण गोष्टी वेगळ्याच कारणामुळे घडतात. तुम्ही वैवाहिक आयुष्यात खुश नसाल किंवा दु:खी असाल, तुमचं पटत नसेल तर घटस्फोट होऊ शकतो. त्यातही जर तुम्ही अंतर्मुख होऊन स्वत:साठी आनंद शोधण्यास असमर्थ असाल तर नात्यात फूट येणं स्वाभाविकच आहे. बरीच वर्षे वैवाहिक आयुष्य जगल्यानंतर जेव्हा तुम्ही विभक्त होता, तेव्हा अचानक एकटेपणा जाणवतो. तुम्हाला अचानक स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं, पण तरीसुद्धा तुम्ही कम्फर्टेबल नसता. तुम्हाला ती स्थिरता, घरी कोणीतरी वाट बघतंय आणि घरचं जेवण या सगळ्यांची आठवण येत असते.”
नातं अपयशी ठरल्याचा ठपका एका व्यक्तीवर ठेवू नये, असंही तो म्हणाला. नात्यात दोघांनी कोणती चूक केली याबद्दल विचार करणं गरजेचं असल्याचं तो म्हणतो. “अशा वेळी हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही सर्व खिडकी, दरवाजे बंद करून, स्वत:ला एकटं ठेवून अंतर्मुख होऊन विचार करणं. मीसुद्धा हेच केलं. असा विचार जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुमच्यात काय कमतरता होती, हे जाणवतं. अर्थात दुसऱ्या बाजूनेही काही चुका झाल्या आहेत. पण त्या तुम्हालाच ठीक करायच्या असतात. त्यातून बाहेर पडताना तुम्ही अधिक सक्षम बनता, कारण तुमच्यावर इतर बऱ्याच लोकांची जबाबदारी असते.”
View this post on Instagram
घटस्फोट हा आदराने आणि प्रेमाने व्हावा, असंही मत त्याने या मुलाखतीत मांडलं. “घटस्फोटाची प्रक्रिया सोपी अजिबात नसते. ते खूप कठीण असतं. तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी.. कोणासाठीच ते सोपं नसतं. मुलांसाठी तर ते सर्वांत कठीण असतं. माझे आईवडीलसुद्धा विभक्त झाले होते, त्यामुळे जेव्हा माझा घटस्फोट होत होता, तेव्हा माझ्यासाठी ती गोष्ट पचवणंच खूप कठीण होतं की मी कुठे चुकलो? जेव्हा मला समजलं की चूक कुठे झाली, तेव्हा मी त्याची जबाबदारी घेतली. सुदैवाने आज आम्ही सर्वजण एकमेकांशी खूप चांगल्याप्रकारे वागतो, एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतो. आम्ही एकमेकांकडून खूप गोष्टी शिकलो”, असं तो पुढे म्हणाला.
“माझ्या मते विशीत आणि तिशीत असताना लग्न करणं हे खूप लवकर होऊन जातं. मी वयाच्या 24 व्या वर्षी लग्न केलं होतं. लग्नासाठी ते वय खूप कमी होतं. त्यानंतर आयुष्यात तुम्हाला बरेच अनुभव येतात आणि तुम्ही अधिक समजूतदार होता. महिलांच्या तुलनेत पुरुष खूप हळूहळू समजूतदार होतात. त्यामुळे पुरुष मूर्ख आहेत, हे सिद्ध झालंय. जर तुम्हाला यशस्वी लग्न पाहिजे असेल तर थोडी प्रतीक्षा करा. कदाचित मी पूर्णपणे चुकीचाही असू शकतो”, अशी खंत त्याने बोलून दाखवली.