Article 370 वर नोटांचा वर्षाव; 3 दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई
अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक केलं जातंय. बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवालच्या 'क्रॅक'सोबत यामीच्या चित्रपटाची टक्कर आहे. मात्र यामीच्या चित्रपटाने 'क्रॅक'ला अवघ्या तीन दिवसांत मागे टाकलंय.
मुंबई : 26 जानेवारी 2024 | अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ या ॲक्शन थ्रिलरशी बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. ‘आर्टिकल 370’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील कमाईचा आकडा 22.8 कोटींवर पोहोचला आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. यामध्ये यामीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणी मुख्य भूमिकेत आहे. ‘आर्टिकल 370’ने पहिल्या दिवशी 5.9 कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कमाईच्या बाबतीत यामी गौतमच्या या चित्रपटाने विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ला मागे टाकलं आहे.
आर्टिकल 370 ची कथा काय?
आर्टिकल 370 हे राज्यघटनेत 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाविष्ट करण्यात आलं. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात भारतीय संविधानातील आर्टिकल 370 संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काय स्थिती होती आणि आर्टिकल 370 हटवण्यासाठी काय-काय करावं लागलं हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटात यामीने जुबी हस्करची भूमिका साकारली आहे. ती एक स्थानिक एजंट असून क्रिमिनल मिशनवर काम करत असते.
View this post on Instagram
या चित्रपटात प्रियामणीला राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत दाखवलं गेलंय. तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसले. अभिनेते किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे. यात अनेकांनी यामी आणि प्रियामणीच्या अभिनयाचं कौतुक केलंय. आर्टिकल 370 काय होतं आणि ते रद्द करणं का गरजेचं होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून पहा, असं अनेकांनी म्हटलंय. अनेकांनी या चित्रपटाला साडेतीन ते चार स्टार्स दिले आहेत. चित्रपटाती कथा पूर्णवेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवते, असंही काहींनी म्हटलंय.