जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी नात जनाई भोसलेसोबत नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी जनाईच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. ती काजोल आणि ऐश्वर्या राय यांच्यासारखीच दिसत असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. जनाईच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

मुंबई : 4 जानेवारी 2024 | आपल्या सुमधूर आवाजाने देशभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आशा भोसले सर्वांनाच माहीत आहेत. आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणीमुळे विशेष चर्चेत आहे. ही तरुणी आशा भोसले यांची नातच आहे. जनाई असं तिचं नाव आहे. जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते. तर काही पार्ट्यांमध्ये तिला बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय. जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे. जनाई ही 20 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याचसोबत उद्योजिकासुद्धा आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात जनाई ही आजी आशा भोसले यांच्यासोबत पोहोचली. यावेळी पापाराझींसमोर दोघींनी फोटोसाठी पोझ दिले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. यावेळी जनाईने पोपटी रंगाची साडी नेसली होती. लांब केस आणि साडीवरील तिचा सुंदर लूक पाहून नेटकरी अक्षरश: घायाळ झाले आहेत. जनाई ही अभिनेत्री काजोल आणि ऐश्वर्या राय यांच्यासारखीच दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलंय.




View this post on Instagram
काजोल आणि ऐश्वर्या राय यांचं मिश्रणच आहे ही, असं एकाने लिहिलंय. तर ‘ती खूपच सुंदर आहे. तिचं हास्य आणि केस सर्वांत सुंदर आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. जनाईचे डोळे ऐश्वर्यासारखे, नाक आणि आयब्रोज काजोलसारखे आहेत, असंही निरीक्षण अनेकांनी नोंदवलंय. जनाईच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नातीसोबतचे काही फोटो आशा भोसले यांनीसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
जनाई तिच्या सौंदर्यासोबतच गायनामुळेही चर्चेत असते. आशा भोसले यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त जनाईने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती आशा भोसलेंचं हिट गाणं ‘तू तू है वही’ गाताना दिसली होती. एका कार्यक्रमात मंचावर ती हे गाणं आजीसोबतच गाताना दिसली होती.