Pathaan | कोण शाहरुख खान? ‘पठाण’च्या वादावर मुख्यमंत्री असं का म्हणाले?
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना काही पत्रकारांनी 'पठाण'वरून होणाऱ्या वादावर आणि बजरंग दलाकडून होणाऱ्या विरोधावर प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "कोण शाहरुख खान? मी त्याला ओळखत नाही."
दिसपूर: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणेच आहे. मात्र पठाणच्या प्रदर्शनापूर्वी देशभरात वाद सुरू आहे. यातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील काही सीन्सनाही हटवण्याची मागणी केली जात आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्तेसुद्धा ‘पठाण’मधील दीपिकाच्या कपड्यांवरून मोठा वाद निर्माण करत आहेत. याप्रकरणी नुकतंच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारला गेला. ‘पठाण’च्या वादावर प्रतिक्रिया देण्यास विचारलं असता, मुख्यमंत्री राग व्यक्त करताना दिसले.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना काही पत्रकारांनी ‘पठाण’वरून होणाऱ्या वादावर आणि बजरंग दलाकडून होणाऱ्या विरोधावर प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “कोण शाहरुख खान? मी त्याला ओळखत नाही आणि मला पठाण चित्रपटाविषयीही काही माहीत नाही.”
शुक्रवारी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आसाममधल्या नरेंगी इथल्या थिएटरबाहेर पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्याचसोबत चित्रपटाचे पोस्टर्ससुद्धा जाळले होते. यावरून जेव्हा मुख्यमंत्री हिमंत यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले “खानने मला फोन नाही केला. मात्र जेव्हा एखादी समस्या उपस्थित झाली तेव्हा वेळोवेळी मला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी फोन केला आहे. जर खानने मला फोन केला, तरच मी या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहीन. जर काही लोकांनी कायदा आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई होईल. त्याचसोबत गुन्हासुद्धा दाखल होईल.”
जेव्हा पत्रकाराने त्यांना सांगितलं की शाहरुख खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्यावर मुख्यमंत्री हिमंत पुढे म्हणाले, “लोकांना आपल्या श्रेत्राची काळजी असायला हवी. आसाममध्ये डॉ. बेझबरुआ- पार्ट 2 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला पाहिजे. दिवंगत निपुन गोस्वामी यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी विचार करा आणि तो पहा. हिंदी चित्रपटांविषयी मला काही सांगू नका.”
पठाणच्या प्रदर्शनाला अवघे तीन दिवस उरले आहेत. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्यासोबत डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.