Avatar 2: अवतार 2 चा जगभरात धुमाकूळ; 72 तासांमध्ये कमावले तब्बल इतके हजार कोटी
समुद्रातील काल्पनिक, अद्भुत विश्वाची जगभरातील प्रेक्षकांना भुरळ; 'अवतार 2'ची थक्क करणार कमाई
मुंबई: जवळपास 13 वर्षांनंतर ‘अवतार’ या ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटाला सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. 16 डिसेंबर रोजी जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2009 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: थक्क केलं होतं. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईचा विक्रम अजूनही अबाधित आहे. आता सीक्वेलनेही थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे.
पहिल्या वीकेंडमध्ये पार केला 3000 कोटींचा टप्पा
जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग झाल्यामुळे ‘अवतार 2’ची पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात छप्परफाड कमाई झाली. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने कमाईचे काही विक्रम मोडले तर काही नवीन विक्रम रचले. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल बॉक्स ऑफिसवर अवतार 2 ने जबरदस्त कमाई केली आहे.
पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने नॉर्थ अमेरिकेत 134 दशलक्ष डॉलर्स, चीनमध्ये 59 दशलक्ष डॉलर्स आणि इतर ठिकाणी 242 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमवला. त्यामुळे याची एकूण कमाई ही जवळपास 435 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 3,598 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
#AvatarTheWayOfWater 1st Weekend BO :
North America – $134 Million
China – $59 Million
Rest of the World – $242 Million
Total – $435 Million
— Ramesh Bala (@rameshlaus) December 18, 2022
भारतात 6 भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित
दिग्दर्शक जेम्स कॅमरूनने अवतार 2 हा चित्रपट भारतात सहा विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. हा चित्रपट थ्रीडी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्येही प्रदर्शित झाला आहे. भारतात या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 133 कोटी रुपयांची कमाई केली.
हॉलिवूड चित्रपटांची भारतातील ओपनिंग कमाई-
1- ॲव्हेंजर्स: एंड गेम- 53.10 कोटी रुपये 2- अवतार: द वे ऑफ वॉटर- 38 कोटी रुपये 3- स्पायडरमॅन: नो वे होम- 32.67 कोटी रुपये 4- ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर- 31.30 कोटी रुपये 5- डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस- 27.50 कोटी रुपये