Dream Girl 2 | ‘ड्रीमगर्ल 2’ने लावला ‘तारा सिंग’च्या गतीला ब्रेक; आयुषमान खुरानाकडून सनी देओलला मात
आयुषमानचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. चंदिगड करे आशिकी, अनेक, डॉक्टर जी आणि ॲक्शन हिरो यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नव्हते. त्यामुळे 'ड्रीम गर्ल 2'च्या निमित्ताने तो दमदार कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे.
मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करताना दिसला. ‘ड्रीम गर्ल 2’मधील पूजाने प्रेक्षकांना अशी भुरळ घातली की तिच्यापुढे सनी देओलचा ‘गदर 2’सुद्धा फिका पडताना दिसतोय. गेल्या दोन आठवड्यांपासून ‘गदर 2’ने तुफान कमाई केली. मात्र आता तिसऱ्या आठवड्यात सनी देओलच्या या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ने पहिल्याच दिवशी ‘गदर 2’च्या कमाईचा वेग कमी केला आहे. ‘ड्रीम गर्ल 2’मधून आयुषमान पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत परतला आहे. या चित्रपटाच्या बजेटच्या हिशोबाने पहिल्या दिवशी दमदार कमाई झाल्याचं म्हटलं जात आहे.
आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या ‘ड्रीम गर्ल 2’ने पहिल्या दिवशी जवळपास 9.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बालाजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत निर्मित झालेला हा चित्रपट वीकेंडला दमदार कमाई करू शकतो. दिग्दर्शक राज शांडियाल यांच्या ‘ड्रीम गर्ल 2’ने पहिल्याच दिवशी अनिल शर्मा यांच्या ‘गदर 2’ला मोठं आव्हान दिलं आहे.
#OneWordReview…#DreamGirl2: ENTERTAINER. Rating: ⭐️⭐️⭐️½#DreamGirl2 is a joyride, its sole funda is to entertain… Has it all: Witty one-liners, cleverly-crafted situations, well-timed jokes and dollops of humour… A worthy second instalment. #DreamGirl2Review… pic.twitter.com/Wc3hxHDDso
— taran adarsh (@taran_adarsh) August 25, 2023
दुसरीकडे सनी देओलच्या ‘गदर 2’च्या कमाईचा वेग हळूहळू कमी होत चालला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पंधराव्या दिवशी 6.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे ‘गदर 2’ची आतापर्यंतची कमाई 425.80 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. हा भारतातील कमाईचा आकडा आहे. जगभरात या चित्रपटाने 545.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सीक्वेन्स आहे. या चित्रपटात आयुषमानने त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांनाच चकीत केलं होतं. पूजाच्या भूमिकेत त्याला ओळखणं कठीण होतं. एका मुलीच्या रुपात असं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन क्वचितच एखाद्या अभिनेत्याचं झालं असेल. मात्र आयुषमानचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. चंदिगड करे आशिकी, अनेक, डॉक्टर जी आणि ॲक्शन हिरो यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नव्हते. त्यामुळे ‘ड्रीम गर्ल 2’च्या निमित्ताने तो दमदार कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे.