‘महाराणा प्रताप’ फेम अभिनेत्रीचा अपघात; बाईकच्या चाकात अडकला ड्रेस अन्..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रोशनी वालियाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रोशनीने सोशल मीडियावर दुखापतीचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. बाईकच्या चाकात ड्रेस अडकल्याने रोशनीचा हा अपघात झाला.

‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ फेम अभिनेत्री रोशनी वालियाचा अपघात झाला. दुचाकीवरून प्रवास करताना ड्रेस चाकात अडकल्याने तिचा अपघात झाला. 23 वर्षीय रोशनीने सोशल मीडियाद्वारे या अपघाताची माहिती दिली. त्याचसोबत बाईकने प्रवास करताना कोणती काळजी घ्यायला हवी, हेसुद्धा तिने नेटकऱ्यांना सांगितलं. रोशनीने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिने तिच्या मांडीवरील जखम दाखवली आहे. “या दुखापतीमुळे मला खूप वेदना होत आहेत. ही दुखापत कशी झाली, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतेय”, असं तिने त्यात म्हटलंय.
या व्हिडीओत रोशनी पुढे सांगते, “दुचाकीवरून प्रवास करताना माझा अत्यंत भयानक अपघात झाला. माझा ड्रेस बाईकच्या चाकात अडकला होता. कृपया दुचाकीने प्रवास करताना अगदी सैल कपडे घालू नका. सुदैवाने माझ्यासोबत यापेक्षा वाईट काही घडलं नाही. पण तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका.” या अपघातानंतर रोशनीने डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रोशनीने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकीवरून प्रवास करताना सैल कपडे, साडी किंवा दुपट्टा हवेने गाडीच्या चाकात अडकण्याची शक्यता असते. यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. म्हणूनच रोशनीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.




View this post on Instagram
रोशनी वालिया ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘देवों के देव महादेव’, ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’, ‘बालिका वधू’, ‘ये वादा रहा’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलंय. याशिवाय तिने वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. रोशनी म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
रोशनीने ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ या मालिकेतून अभिनयातील करिअरची सुरुवात केली. तिचा जन्म 20 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झाला. ती सध्या मुंबईत राहते. रोशनीने बालकलाकार म्हणून काही जाहिरातींमध्येही काम केलंय.