Akanksha Dubey | भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल मोठी अपडेट
आकांक्षाने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती रडताना दिसत होती. आकांक्षाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. कारण या व्हिडीओनंतरच तिने आत्महत्या केली.
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सारनाथच्या एका हॉटेल रुममध्ये ती मृतावस्थेत आढळली होती. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आकांक्षाने टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. आकांक्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. मात्र त्यांनी तो सीलबंदच ठेवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरही त्यातील माहिती पोलीस का सांगत नाहीयेत, असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. मात्र पोलिसांनी हे आधीच स्पष्ट केलंय की आकांक्षाने आत्महत्या केली आहे.
आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. आई मधू दुबे यांनी आकांक्षाचा एक्स बॉयफ्रेंड आणि भोजपुरी गायक समर सिंह याच्यावर हत्येचा आरोप केला आहे. समर आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनी मिळून माझ्या मुलीला मारलं, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो तिला सतत त्रास देत होता. इतकंच नव्हे तर तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली जात होती, असं त्यांनी म्हटलंय.
अक्षरा सिंहला केला होता कॉल
आकांक्षाने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती रडताना दिसत होती. आकांक्षाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. कारण या व्हिडीओनंतरच तिने आत्महत्या केली. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने सांगितलं की आत्महत्येपूर्वी आकांक्षाने तिला कॉल केला होता. मात्र कामात व्यग्र असल्यामुळे ती फोन उचलू शकली नव्हती.
वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2019 मध्ये आकांक्षाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘मेरी जंग मेरा फैसला’ हा तिचा पहिला चित्रपट होता. आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि फार कमी वेळात तिला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकप्रियतेसोबतच आकांक्षाने पैसाही कमावला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरुनही पैसे कमवायची. याशिवाय तिचा एक युट्यूब चॅनलसुद्धा आहे.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.