“अनुषामुळे मनीष मल्होत्राच्या पार्टीत गेलो, ती इंडस्ट्री..”; मराठी अभिनेता भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्टीचा अनुभव
भूषण प्रधानची गर्लफ्रेंड अनुषामुळे त्याला मनीष मल्होत्राच्या पार्टीत जाण्याचा योग आला. भूषणने बॉलिवूडच्या पार्ट्या नेमक्या कशा असतात त्याबद्दल त्याचा अनुभव सांगितला आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहायला गेलं तर बॉलिवूडप्रमाणे पार्ट्या फार कमी होतात. त्यामुळे मराठी कलाकारांना कदाचित बॉलिवूड पार्ट्या कशा असतात हे जाणून घेण्यास फारसा रसही नसतो. मराठी फिल्म इंडस्ट्री ही बॉलिवूडच्या जगापेक्षा प्रचंड वेगळी आहे. पण असा एक मराठमोळा अभिनेता आहे ज्याने पहिल्यांदाच या बॉलिवूड पार्टीला हजेरी लावला आणि त्याने सगळाच खुलासा केला.
अनुषामुळे भूषण प्रधान मनीष मल्होत्राच्या पार्टीत
हा मराठमोळा अभिनेता आहे भूषण प्रधान. भूषण बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत राहिला आहे. ‘जुनं फर्निचर’, ‘घरत गणपती’, ‘लग्नकल्लोळ’ हे त्याचे सिनेमे बॅक टू बॅक रिलीज झाले होते. भूषणच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. तसंच ‘जुनं फर्निचर’ मुळे भूषणला खऱ्या आयुष्यातली पार्टनर मिळाली ती म्हणजे अनुषा दांडेकर. अनुषा या सिनेमात त्याची बायको झाली होती. अनुषा आज त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यांचे कपल फोटो, व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. अनुषा बॉलिवूडमध्येही सक्रीय असते. तिची सख्खी बहीण शिबानी दांडेकर फरहान अख्तरची पत्नी आहे.
भूषणने सांगितला बॉलिवूड पार्ट्यांचा अनुभव
अनुषामुळेच भूषणला एका बॉलिवूड पार्टीला जाता आलं. नुकताच भूषणने मनीष मल्होत्राच्या पार्टीला हजेरी लावली होती. त्याने याचा अनुभवही सांगितला आहे.बॉलिवूडमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी अनेकदा कलाकार जमतात आणि पार्टी करतात. एकदा अनुषासोबत भूषणनेही या पार्टीला हजेरी लावली होती.
एका मुलाखतीत त्याने या पार्टीचा अनुभव सांगितला, तो म्हणाला की, “मी काही बऱ्याच पार्ट्यांना गेलेलो नाही. फार जातही नाही. अनुषाच्या वाढदिवसाची पार्टी केली होती. नंतर एकदा मनीष मल्होत्राच्या पार्टीला गेलो होतो. खरं तर यामुळे तीही इंडस्ट्री कळली. जशी आपली इंडस्ट्री आहे, सगळे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत तसेच तेही तेवढेच जवळचे मित्र आहेत. आपण नेहमी ऐकलंय की बॉलिवूड पार्टी खूप वरवरच्या असतात पण कदाचित प्रत्येक पार्टी वेगळी असेल.”
‘सतत पार्टीला जाऊ शकत नाही….’
तो पुढे म्हणाला, “मनीष मल्होत्राच्या पार्टीचं सांगायचं तर तिकडे असं जाणवलं की सर्व लोक खऱ्या अर्थानो मनीषवर प्रेम करणारे होते. म्हणून जे तिथे पोहोचले ते बरेचसे त्याच्यावरील प्रेमामुळे पोहोचले होते. सगळे जण मजा मस्ती करत होते जे पाहून बरं वाटलं. बऱ्याच कलाकारांशी भेट झाली. या सगळ्या आठवणी माझ्या मनात आहेत. मोठमोठ्या कलाकारांना भेटणं, त्यांच्याकडून ती एनर्जी मिळणं, संवाद साधून चार गोष्टी शिकणं हे खूप आपोआप घडतं. पण अनुषाचे आभार कारण मी तिच्यामुळे मनीष मल्होत्राच्या पार्टीला जाऊ शकलो. हे अनुभव तिच्यामुळेच मिळाले. पण मी काही सतत पार्टीला जाऊ शकत नाही. मला घरीच राहायला आवडतं. मागच्या मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीलाही तिने मला विचारलं होतं. पण मी नाही म्हणलं. मुळात पार्टी हा प्रकार मला आवडत नाही. त्यापेक्षा घरी भेटू, गप्पा मारु यातून खरी व्यक्तीही कळते असं मला वाटतं. असे संवाद समृद्ध करणारे असतात.” असं म्हणत त्याने बॉलिवूड पार्टीचा अनुभव शेअर केला आहे.
भूषण प्रधानचा शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. सुमारे दीड वर्षांपासून भूषण आणि अनुषा एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची ‘जुनं फर्निचर’ मध्येही चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांची मालदीव ट्रीपही खूप गाजली होती.