Bigg Boss 16 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने विराट कोहलीचा मोडला ‘हा’ रेकॉर्ड
एमसी स्टॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. असं असलं तरी त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता ट्रॉफी जिंकल्यानंतरही स्टॅनने लोकप्रियतेच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे एमसी स्टॅनने विराट कोहलीचाही विक्रम मोडला आहे.
मुंबई: कलर्स टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. या ग्रँड फिनालेची अद्याप सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मात देत रॅपर एमसी स्टॅनने विजेतेपद पटकावलं. एमसी स्टॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. असं असलं तरी त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता ट्रॉफी जिंकल्यानंतरही स्टॅनने लोकप्रियतेच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे एमसी स्टॅनने विराट कोहलीचाही विक्रम मोडला आहे.
एमसी स्टॅनची पोस्ट
रविवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. शो जिंकल्यानंतर त्याने सूत्रसंचालक सलमान खानसोबतचा ट्रॉफीचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘आम्ही इतिहास रचला आहे. शेवटपर्यंत आम्ही खरेपणाने वागलो. अम्मीचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ट्रॉफी मला मिळाली आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्या सर्वांचा या ट्रॉफीवर हक्क आहे.’ स्टॅनने पोस्ट केलेल्या याच फोटोने विराह कोहलीचाही विक्रम मोडला आहे.
View this post on Instagram
विराट कोहलीला टाकलं मागे
एमसी स्टॅनच्या या पोस्टला 69,52,351 लाइक्स आणि 1,47,545 कमेंट्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे याआधी बिग बॉस जिंकणाऱ्या कोणत्याच स्पर्धकाला सोशल मीडियावर इतके लाइक्स आणि कमेंट्स मिळाले नव्हते. एमसी स्टॅनने याबाबतीत बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि बिग बॉस 14 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांनाही मागे टाकलं आहे.
स्टॅनची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे चाहते याची तुलना विराट कोहलीशी करत आहेत. विराटच्या एका पोस्टचा स्क्रीनशॉट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला स्टॅनच्या पोस्टच्या तुलनेत कमी लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.
माजी स्पर्धकांकडून टीका
बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांच्यात चुरस रंगली होती. फिनालेच्या काही दिवस आधीपासून शिव ठाकरे आणि प्रियांकाच्या नावाची जोरदार चर्चा होती. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी एमसी स्टॅन विजेता ठरल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्टॅन शोमध्ये विशेष काहीच न करता हा शो जिंकला, अशी तक्रारही काही माजी स्पर्धकांनी केली.
एमसी स्टॅन हा मूळचा पुण्याचा आहे. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्याने संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली. वटा, खुजा मत ही त्याची सुरुवातीची गाणी खूप गाजली होती. एमसी स्टॅन हा अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला. सध्या त्याच्या युट्यूब चॅनलचे सहा लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.