Bigg Boss 16 | ‘तू जिंकण्याच्या लायक नाहीस’ म्हणणाऱ्यांना एमसी स्टॅनचं सडेतोड उत्तर
फिनालेच्या काही दिवस आधीपासून शिव ठाकरे आणि प्रियांकाच्या नावाची जोरदार चर्चा होती. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी एमसी स्टॅन विजेता ठरल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबई: रॅपर एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांच्यात चुरस रंगली होती. फिनालेच्या काही दिवस आधीपासून शिव ठाकरे आणि प्रियांकाच्या नावाची जोरदार चर्चा होती. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी एमसी स्टॅन विजेता ठरल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्टॅन काहीच न करता शो जिंकला, असा आरोप काही माजी स्पर्धकांनी केला. तर तो विजेतेपद पटकावण्याच्या लायकीचा नाही, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. त्यावर आता खुद्द एमसी स्टॅनने सडेतोड उत्तर दिलं आहे.
“मी जिंकण्याच्या लायक”
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर मी त्यांचा विचारसुद्धा करत नाही. मला काहीच फरक पडत नाही. मला खरंतर असेच लोक आवडतात ज्यांचा जळफळाट होत असतो. माणसातील ही खूपच नैसर्गिक भावना आहे. फक्त समोरच्या व्यक्तीला ही गोष्ट स्वीकारायची असते की ती ईर्षा त्यांच्यासाठी नाही. बऱ्याच चाहत्यांप्रमाणे मलासुद्धा धक्का बसला. पण मी जिंकण्याच्या लायक आहे, असं मला वाटतं.”
एमसी स्टॅन हा मूळचा पुण्याचा आहे. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्याने संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली. वटा, खुजा मत ही त्याची सुरुवातीची गाणी खूप गाजली होती. एमसी स्टॅन हा अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला. सध्या त्याच्या युट्यूब चॅनलचे सहा लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.
ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसचा प्रेक्षक दोन गटांमध्ये विभागला गेला होता. शिव ठाकरे हा या सिझनचा विजेता ठरेल असं एका गटाला वाटत होतं. तर दुसऱ्या गटाचा मोठा पाठिंबा प्रियांका चहर चौधरीला होता. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असे अंदाज वर्तवले जात होते.
बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचा टोला
बिग बॉसचा माजी स्पर्धक गौतम विज याने एमसी स्टॅनच्या विजेतेपदावर आश्चर्य व्यक्त केलं. “हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का होता. कारण प्रियांका विजेती ठरेल अशी आम्ही अपेक्षा करत होतो. ती दररोज सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंडमध्ये होती”, असं गौतम म्हणाला.
एमसी स्टॅनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत गौतम पुढे म्हणाला, “प्रियांकानंतर शिव तरी विजेता ठरेल अशी माझी अपेक्षा होती. एमसी जिंकलाय.. चांगली गोष्ट आहे की तो जिंकला आहे. उशिरा गेम समजला पण चांगली बाब आहे की समजलं. तर माझ्या मते पुढच्या वेळी ही लोकांची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की उशिरा गेम समजून घ्या आणि ट्रॉफी घेऊन जा.”