Bigg Boss 17 : ‘प्रत्येक एपिसोडमध्ये घाणेरड्या गोष्टी…’, अंकिता लोखंडला सर्वांसमोर मागावी लागली सासऱ्यांची माफी
Bigg Boss 17 : 'कुटुंबियांची माफी मागते, सासऱ्यांची माफी मागते पण...', 'बिग बॉस 17' मध्ये अंकिता लोखंडे हिला मागावी लागली सासरच्या मंडळींची माफी..., सध्या सर्वत्र विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्या नात्याची चर्चा...
मुंबई | 12 जानेवारी 2024 : ‘बिग बॉस 17’ मध्ये फॅमिली विक दरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांच्या कुटुंबियांची एन्ट्री झाली. ‘बिग बॉस’ मध्ये आल्यानंतर अंकिता लोखंडे हिच्या सासूबाई रंजना जैन आनंदी होत्या. सर्वांसोबत मस्ती करत होत्या. त्यानंतर बिग बॉसने अंकिता लोखंड आणि सासू रंजना जैन यांना थेरेपी रुममध्ये बोलावलं आणि दोघी समोरा-समोर बोलू शकता असं सांगितलं. अखेर रंजना जैन यांनी सून अंकिता हिला तुझे सासरे नाराज असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर, अंकिता हिला सर्वांसमोर सासऱ्यांची माफी देखील मागावी लागली.
काय म्हणाल्या अंकिता हिच्या सासूबाई?
‘अंकिता तुला माहिती आहे आपलं कुटुंब कसं आहे. तुझ्या आणि विकीच्या लग्नामुळे कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी आणि उत्साही होता. तुझा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला तरी, प्रत्येक जण आनंदी व्हायचे… तुमच्या दोघांचं लग्न म्हणजे अनेकांसाठी आदर्श होता. त्याचं आता काय झालं आहे?’ असा प्रश्न देखील रंजना जैन यांनी उपस्थित केला.
‘आज बाबा (अंकिता हिचे सासरे) माझ्यासोबत भांडतात. म्हणतात, सांगितलं होतं तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये भांडणं होतील. सर्वांसमोत फक्त भांडणं… दोघांमध्ये देखील भांडणं… बाबा प्रचंड नाराज आहेत. मान्य आहे विकीने देखील तुझ्यासाठी अपशब्दांचा वापर केला आहे. ‘पवित्र रिश्ता’मुळे प्रत्येक घरात तू लाडकी आहेस, पण याठिकाणी सर्वकाही उलट झालं आहे.’
पुढे अंकिताच्या सासूबाई म्हणाल्या, ‘प्रत्येक एपिसोडमध्ये फक्त आणि फक्त घाणेरड्या गोष्टी… आम्ही कसं सहण करायचं हे सगळं… जेव्हा तू विकीला लाथ मारलीस तेव्हा तुझ्या सासऱ्यांनी तुझ्या आईला फोन केला आणि म्हणाले, ‘तुम्ही देखील तुमच्या पतीसोबत असेच वागत होत्या का?…’
यावर अंकिता लोखंडे म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांना चुकूनही काही बोलू नका… तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते मला बोला.. मी ऐकत आहे. मी याठिकाणी बसली आहे. माझी काहीही चूक नाही असं मी बोलतच नाही… माझ्या वडिलांचं आताच निधन झालं आहे.. यात माझ्या आई – वडिलांची काहीही चूक नाही… मी तुमची माफी मागते… बाबा (सासरे) तुमची माफी मागते. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर संपूर्ण कुटुंबाची माफी मागते… पण माझ्या आई – वडिलांना काहीही बोलू नका…’ असं देखील अंकिता लोखंडे म्हणाली.