सिद्दिकींनंतर ‘बिग बॉस’चा हा विजेता लॉरेन्स बिष्णोईचा हिटलिस्टवर? मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता बिग बॉसचा विजेता लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टवर असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सप्टेंबर महिन्यातील त्याचा एक कार्यक्रमसुद्धा रद्द करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याच लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टवर ‘बिग बॉस 17’चा विजेता आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी असल्याचं कळतंय. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. मुनव्वरच्या जिवाला धोका असल्याचं लक्षात घेत मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही त्याला संरक्षण दिलं आहे”, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
जरी त्यांनी या धमक्यांचा संबंध अधिकृतपणे कोणत्याही विशिष्ट गटाशी जोडला नसला तरी या धमक्यांचा संबंध बिष्णोई टोळीशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या घटनेचाही विचार करून पोलिसांनी मुनव्वरच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सप्टेंबरमध्ये मुनव्वर दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी होणार होता. मात्र दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला त्याच्यावरील संभाव्य हल्ल्याची गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली, तेव्हा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पोलीस संरक्षणात त्याला दिल्लीहून मुंबईला आणलं गेलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनाही संबंधित परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि सुरक्षा वाढवण्यास सांगितलं गेलं.
View this post on Instagram
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील व्यापारी नादिर शाह यांच्या हत्येच्या तपासादरम्यान मुनव्वरच्या जिवाला संभाव्य धोक्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी अटक केलेल्या शूटरने पोलिसांना सांगितलं की, युट्यूबर एल्विश यादवसोबत मुनव्वर मॅच पहायला जाणार होता, तेव्हा ज्या हॉटेलमध्ये तो राहत होता, त्याठिकाणी त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. या माहितीमुळे पोलिसांनी मुनव्वरच्या सुरक्षेकडे भर दिला आणि त्याला मुंबईत परत पाठवलं गेलं.
याआधी अभिनेता सलमान खानलाही लॉरेन्स बिष्णोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येही सलमानचा उल्लेख होता. जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करेल, त्यांना आपला हिशोब तयार ठेवावा लागेल, असं त्यात लिहिलं होतं.