अखेर ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार कल्ला
मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारं बिग बॅास मराठीचं सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.
तंटा नाय तर घंटा नाय… रितेश देशमुखचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरात तोंडपाठ झालाय. सर्व रिअॅलिटी शोचा बाप असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार प्रोमो आऊट झाले. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी बॉसगिरी’ पाहायला मिळाली. आता एक नवीन प्रोमो ‘बिग बॉस’प्रेमींच्या भेटीला आलाय. प्रोमो पाहून नेटकरी म्हणतायत,”आररर खतरनाक!” या नव्या प्रोमोसोबतच ‘बिग बॉस’च्या घराचं दार कधी उघडणार याचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळाला. पण नव्या प्रोमोमध्ये रितेश एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतोय. प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार… पण जे वाईट वागणार त्यांची तो… एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सिझन गाजणार. कारण रितेश भाऊ म्हणतोय,”मी येणार तर कल्ला होणारच”. आपल्या लाडक्या ‘बिग बॉस’ प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सिझनची तारीखदेखील जाहीर केली आहे.
View this post on Instagram
तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झळकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी’चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार आहे. प्रत्येक आठवड्यात झटका लागेल आणि मनोरंजनाचा धमाका होणार आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या सूत्रसंचालकाची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची, अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन येत्या 28 जुलैपासून सुरू होणार आहे. हा शो दररोज रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’वर आणि Jiocinema प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘बिग बॉस मराठी 5’चा नवीन प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. महेश मांजरेकर नाहीत, हे जाणून काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. ‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले, “मी सध्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय एका कन्नड चित्रपटाचंही काम सुरू आहे. शूटिंगसाठी मला सतत दिल्ली, लंडन, बँकॉक याठिकाणी जावं लागतंय. पुढील दोन ते तीन महिने मी या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणार आहे. माझ्या मनातही काही कल्पना आहेत. त्यामुळे हे शूटिंग संपल्यानंतर त्यावर मी काम करणार आहे. म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही.”