‘बिग बॉस ओटीटी 3’च्या स्पर्धकांना मध्यरात्री झटका; 2 तगड्या स्पर्धकांचं एलिमिनेशन
बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या 2 ऑगस्ट रोजी त्याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ग्रँड फिनालेसाठी पाच स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. त्यापैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
‘बिग बॉस ओटीटी 3’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना शोमधून दोन मोठ्या स्पर्धकांचं एलिमिनेशन झालं आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सात स्पर्धक राहिले होते. मात्र मध्यरात्री अचानक डबल एव्हिक्शनचा निर्णय घेत बिग बॉसने सर्वांनाच धक्का दिला. सातपैकी दोन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दोन स्पर्धकांची जिंकण्याची शक्यता खूप होती. विशेष म्हणजे त्यातील एका स्पर्धकाला सोशल मीडियावर बराच पाठिंबा मिळत होता. अशातच या दोघांना बाहेर काढल्यामुळे आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी फक्त पाच स्पर्धक शिल्लक राहिले आहेत.
बिग बॉसने ज्या दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्यापैकी एक युट्यूबर अरमान मलिक आणि दुसरा लवकेश कटारिया आहे. त्यामुळे आता रणवीर शौरी, सना मकबूल, नेझी, कृतिका मलिक आणि साई केतन राव हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या शोमध्ये पोहोचला होता. त्यापैकी पायल या शोच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडली होती. त्यानंतर अरमान आणि कृतिकाची खेळी चांगलीच रंगली होती. मात्र इतरांना फसवण्याचा त्याचा स्वभाव आणि बहुपत्नीत्वचं समर्थन यांमुळे तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्यातही विशाल पांडेवर हात उचलल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विशालने अरमानची पत्नी कृतिकाबद्दल टिप्पणी केली होती, त्यावरून तो भडकला होता. मात्र त्याचं हे वागणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं.
View this post on Instagram
युट्यूबर लवकेश कटारियाचा बिग बॉसच्या घरातील स्वभाव अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या स्वभावामुळेच त्याचं अनेकदा रणवीर शौरीसोबत भांडणं झालं होतं. लवकेश हा ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवचा मित्र आहे. मात्र बिग बॉसच्या घरात त्याची कोणाशीच चांगली मैत्री झाली नाही. प्रत्येक स्पर्धकासोबत त्याची भांडणं झाली आहेत. त्याचे चाहते त्याला शो जिंकण्यात मदत करतील असा त्याला विश्वास होता. त्यामुळे त्याचं एव्हिक्शन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.