Animal पाहिल्यानंतर आई प्रकाश कौर यांनी बॉबीला फटकारलं; काय म्हणाल्या धर्मेंद्र यांच्या पत्नी?
बॉबी देओलने ‘ॲनिमल’ या चित्रपटात अबरार हक् ही खलनायकी भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याची भूमिका फारशी मोठी नसली तरी त्याने विशेष छाप सोडली आहे. एखादा रानटी खलनायक कसा असतो, त्या हिशोबाने मी ही भूमिका साकारली, असं बॉबी म्हणाला.
मुंबई : 7 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाचाच सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या नव्या जोडीसोबतच चित्रपटातील खलनायक बॉबी देओलच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने ‘ॲनिमल’मधील त्याच्या कामगिरीवर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा केला. वडील धर्मेंद्र आणि मोठा भाऊ सनी देओल यांनी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही. मात्र आईने ‘ॲनिमल’ पाहिल्यानंतर फटकारल्याचं बॉबीने सांगितलं. धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि बॉबीची आई प्रकाश कौर यांना ‘ॲनिमल’मधील कोणती गोष्ट खटकली, याचाही खुलासा त्याने केला.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात मी वडिलांच्या निधनाचा सीन पाहू शकलो नाही. तसंच ‘ॲनिमल’ या चित्रपटात माझ्या मृत्यूचा सीन आईला सहन झाला नाही. असे चित्रपट करत जाऊ नकोस, मी पाहू शकत नाही, असं ती मला म्हणाली. तेव्हा मी तिला समजावलं की, हे बघ मी तुझ्यासमोर धडधाकट उभा आहे. चित्रपटात ते फक्त अभिनय होतं. पण माझ्या कामगिरीवर ती खुश आहे. तिला तिच्या मित्रमैत्रिणींचे फोन येतायत आणि माझ्याशी भेटण्याची इच्छा ते व्यक्त करतायत. जेव्हा आश्रम ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती, तेव्हासुद्धा असंच काहीसं घडलं होतं.”
View this post on Instagram
एका दुसऱ्या मुलाखतीत बॉबीने त्याच्या पत्नी आणि मुलाच्या प्रतिक्रियेविषयीही सांगितलं. “माझ्या वडिलांनी आणि भावाने अद्याप हा चित्रपट पाहिला नाही. पण कुटुंबातील इतरांनी ‘ॲनिमल’ पाहिला आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर माझ्याविषयी जे वाटतंय, तशीच त्यांचीही प्रतिक्रिया आहे. अर्थातच ते माझं कौतुक करत आहेत पण एक अभिनेता म्हणून त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास केला. योग्य चित्रपट माझ्या वाटेला येईल, याची प्रतीक्षा त्यांनी केली”, असं तो म्हणाला.
“माझी मुलं आणि पत्नीच्या डोळ्यात मी फक्त आनंदच पाहू शकतोय. एक वडील म्हणून मी त्यांच्यासाठी काय करू शकतो, हे मला पहिल्यांदाच निदर्शनास आलं आहे. त्यांनी माझं अपयश पाहिलंय आणि आता ते माझं यशसुद्धा पाहत आहेत”, अशा शब्दांत बॉबीने भावना व्यक्त केल्या आहेत.