‘ॲनिमल’च्या सेटवर भाऊ सनी देओलच्या मृत्यूच्या विचाराने बॉबीला कोसळलं रडू; नेमकं काय घडलं?
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात बॉबीने अबरारची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.
मुंबई : 13 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटात बापलेकाच्या नात्यातील संघर्ष एका हिंसक विश्वाच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरने रणविजय सिंहची भूमिका साकारली आहे. तर अभिनेते अनिल कपूर हे त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बलबिर सिंहच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता बॉबी देओलच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे. चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं नाव अबरार हक असं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने शूटिंग करतानाचा अनुभव सांगितला. ‘ॲनिमल’मधील एका अत्यंत महत्त्वाच्या सीनमध्ये भाऊ सनी देओलला गमावल्याची कल्पना केली होती, असं तो म्हणाला.
‘ॲनिमल’मधील एका सीनमध्ये रणविजय (रणबीर) हा अबरारचा (बॉबी) भाऊ असरार हकची हत्या करतो. याबद्दलची माहिती जेव्हा अबरारला देण्यात येते, तेव्हाचा हा सीन आहे. चित्रपटात अभिनेता बबलू पृथ्वीराजने बॉबी देओलच्या भावाची भूमिका साकारली आहे. या सीनविषयी बोलताना बॉबी म्हणाला, “मी जेव्हा चित्रपटातील सीन शूट करत होतो, तेव्हा तो सीन हा भाऊ गमावल्याचा होता. एका भावाने त्याच्या दुसऱ्या भावाला गमावलंय. असा सीन शूट करताना एक अभिनेता म्हणून आम्हाला आमच्या खऱ्या आयुष्यातील घटना आठवून मनात त्या भावना आणायच्या असतात. त्याच भावना आम्हाला पडद्यासमोर मांडायच्या असतात. माझ्यासाठी माझा भाऊ म्हणजे संपूर्ण विश्व आहे. जेव्हा मी तो सीन शूट करत होतो, तेव्हा मी माझा भाऊ गमावला आहे, अशा भावना मनात आणायच्या होत्या. त्यावेळी ती भावना इतकी तीव्र होती की खरंच असं काही झाल्याचं वाटलं होतं.”
View this post on Instagram
“म्हणूनच प्रत्येकाला तो सीन मनाला भिडला. आम्ही वन टेकमध्ये तो सीन शूट केला होता. त्या शूटिंगनंतर दिग्दर्शक संदीप माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर हा अवॉर्ड विनिंग शॉट आहे. जेव्हा दिग्दर्शक स्वत: तुमच्याजवळ येऊन असं काही बोलतो, तेव्हा ते खूप महत्त्वाचं असतं”, असं बॉबीने पुढे सांगितलं. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 750 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’नंतर हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.