रश्मिका मंदानासोबत काम देण्याचं आश्वासन देऊन फसवणूक; पत्नीसह बॉलिवूड अभिनेत्याला अटक
पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी सांगितलं, आरोपीने रश्मिका मंदानासारख्या टॉप अभिनेत्री आणि क्रिकेटर्ससोबत प्रमोशनल व्हिडिओमध्ये बालकलाकाराला काम देण्याचं आश्वासन देऊन पालकांकडून लाखो रुपये लुटले.
हैदराबाद: सायबराबादच्या पोलिसांनी हैदराबादमधून एक बॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या पत्नीला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली. संबंधित अभिनेत्याने पत्नीसोबत मिळून एका बालकलाकाराला काम देण्याचं आश्वासन देत पालकांकडून लाखो रुपये लुटले, असा आरोप आहे. पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी सांगितलं, आरोपीने रश्मिका मंदानासारख्या टॉप अभिनेत्री आणि क्रिकेटर्ससोबत प्रमोशनल व्हिडिओमध्ये बालकलाकाराला काम देण्याचं आश्वासन देऊन पालकांकडून लाखो रुपये लुटले.
आरोपीचं नाव अपूर्व दावड़ा उर्फ अरमान अर्जुन कपूर उर्फ डॉक्टर अमित असं असून तो 47 वर्षांचा आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव नताशा कपूर उर्फ नाज़िश मेमन, उर्फ मेघना असं असून ती 26 वर्षांची आहे. या दोघांनी बालकलाकाराच्या आई वडिलांकडून 15 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आरोपींनी याआधीही अशाच प्रकारची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशिवाय त्यांच्या विरोधात आणखी 3 खटले दाखल आहेत.
अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरोधात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. बालकलाकारांना मॉडेलिंग असाइनमेंट देण्याचं आश्वासन देऊन त्यांनी एका मॉडेलिंग एजन्सीद्वारे काही मॉल्समध्ये रॅम्प शोजचं आयोजन केलं होतं. लहान मुलांच्या मेकअप आणि कपड्यांच्या नावाखाली त्यांनी पालकांकडून काही पैसे घेतले होतं.
मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मॉलमध्ये गेलो असता तिथे एका मॉडेलिंग एजन्सीने अप्रोच केलं. तिथे मुलीकडून रॅम्प वॉकसुद्धा करवून घेतला, अशी माहिती तक्रारकर्त्या पालकांनी दिली. फायनल राऊंडच्या आधी त्यांच्याकडून 3.25 लाख रुपये घेतले होते. तर सहा दिवसांच्या फोटोशूटसाठी एकूण 14 लाख 12 हजार रुपये मागण्यात आले होते. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत एका बिस्किट कंपनीच्या जाहिरातीचं शूटिंग करण्यात येईल, असं आश्वासन पालकांना देण्यात आलं होतं.
याप्रकरणी पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्यासह पत्नीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय पोलिसांनी चार आयफोन आणि एक अॅपलचा लॅपटॉपसुद्धा जप्त केला आहे.