“20-30 वर्षांत जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं”; आमिर खानचे डोळे पाणावले
'सैराट' या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' (Jhund) हा चित्रपट येत्या 4 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
‘सैराट’ या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट येत्या 4 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानसाठी (Aamir Khan) या चित्रपटाच्या खासगी स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. ‘झुंड’ हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असल्याचं मत आमिरने यावेळी मांडलं. हा चित्रपट पाहताना आमिरचे डोळे पाणावले. चित्रपटाचा शेवट झाल्यानंतर खासगी स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या सर्वजणांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या प्रायव्हेड स्क्रिनिंगला सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्याची घटना घडली, असं आमिर म्हणाला. (Aamir Khan Reaction to Jhund)
‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरची प्रतिक्रिया- “चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. चित्रपटात मुलांनी दमदार अभिनय केलं आहे. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. या चित्रपटाने मला आश्चर्यचकीत करून सोडलं आहे. जे आम्ही गेल्या 20-30 वर्षांत करू शकलो नाही, ते नागराजनं या एका चित्रपटातून करून दाखवलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी हा एक आहे”, अशा शब्दांत आमिरने ‘झुंड’चं कौतुक केलं.
यावेळी आमिरने चित्रपटातल्या कलाकारांचीही भेट घेतली. ‘सैराट’मधील परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसरसुद्धा यावेळी उपस्थित होता. आमिरने आकाशच्याही अभिनयाचं कौतुक केलं. त्या सर्व मुलांना आमिरने त्याच्या घरी आमंत्रित केलं. ‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सैराट’मधील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’मधील ‘जब्या’ अर्थात सोमनाथ अवघडे यानेही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या: झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी