Jhund: मराठमोळ्या नागराज मंजुळेंसाठी अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; बिग बींचं कौतुक करावं तेवढं कमी!
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं होतं. अखेर येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं होतं. अखेर येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून बिग बी विजय यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी बिग बींनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याबद्दलचा खुलासा नुकताच चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. ‘झुंड’साठी घेतलेल्या मानधनात कपात करत ते पैसे चित्रपटाच्या इतर गोष्टींसाठी वापरण्यास दिल्याचं निर्माते संदीप सिंह यांनी सांगितलं. ‘झुंड’च्या निमित्ताने ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
झुंडचे निर्माते संदीप सिंह यांनी नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, चित्रपटाचं बजेट माफक होतं. पण फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या भूमिकेत ते अमिताभ बच्चन यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच कलाकाराची कल्पना करू शकत नव्हते. तर बिग बी हे फुटबॉल चाहते आहेत. चित्रपटाची कथा त्यांना इतकी आवडली की त्यासाठी त्यांनी मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. बिग बींचा निर्णय ऐकून त्यांच्या इतरही काही कर्मचार्यांनी त्याचं अनुकरण केलं आणि त्यांची फी कमी केली. चित्रपटावर हे पैसे खर्च करता येतील, या विचाराने त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाले, “बच्चन सरांना स्क्रिप्ट खूपच आवडली. चित्रपटाचा बजेट माफक असताना बिग बींना भूमिकेसाठी कसं तयार करावं याचा विचार आम्ही करत असताना, त्यांनी मानधनात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला. माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही चित्रपटावर ते पैसे खर्च करा, असं बिग बी म्हणाले.”
View this post on Instagram
अमिताभ बच्चन आणि त्यांच्या स्टाफने मानधनात कपात केल्यानंतरही चित्रपटासमोर काही आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. 2018 मध्ये नागराज यांनी पुण्यात या चित्रपटाचा सेट उभारला होता. मात्र आर्थिक अडचणींमुळेच त्यांना हा सेट तिथून काढावा लागला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर चित्रपटाचं शूटिंग रखडलं होतं. अखेर जेव्हा टी-सीरिजने चित्रपटाची कथा वाचली, तेव्हा त्यांनी चित्रपटाला आर्थिक मदत करण्याचं सांगितलं. “आम्ही संपूर्ण चित्रपटाची शूटिंग नागपुरात केली. भूषण कुमार यांनी आमच्या टीमवर विश्वास ठेवल्याने हे शक्य झालं. नागराज यांनीच चित्रपटातील फुटबॉल टीम निवडली. नागराज आणि त्यांच्या भावाने नागपूरच्या रस्त्यावरून या मुलांना निवडलं”, असं संदीप यांनी सांगितलं.
‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सैराट’मधील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’मधील ‘जब्या’ अर्थात सोमनाथ अवघडे यानेही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!
संबंधित बातम्या: झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी