अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना, कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
अभिनेत्री जयाप्रदा यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी मोठी बातमी समोर आली आहे. जयाप्रदा या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला आहे. पण त्यांना आता पोलिसांकडून अटक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रामपूर | 26 जानेवारी 2024 : माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा नाहटा यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. जयाप्रदा यांना आता कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे. कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरोधाच अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाने पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करुन कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरण हे लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आहे.माजी खासदार जयाप्रदा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दरम्यान त्यांच्याविरोधात आचरसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. विशेष न्यायाधीश एमपी-एमएल मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत जयाप्रदा या सातत्याने दिलेल्या तारखेला कोर्टात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
विशेष म्हणजे कोर्टाने त्यांच्याविरोधात अशाप्रकारचं वॉरंट याआधीदेखील जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण तरीही जयाप्रदा सुनावणीच्यावेळी कोर्टात हजर राहिल्या नाहीत. या प्रकरणावर एडीजीसी संदीप सक्सेना यांनी सांगितलं की, जयाप्रदा वारंवार दिलेल्या तारखेवर कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार आहे.
कोर्टाचे पोलिसांना नेमके आदेश काय?
कोर्टाने पोलिसांना आदेश दिले आहेत की, जयाप्रदा यांना अटक करुन कोर्टात सादर करण्यात यावं. त्यानंतर आता जयाप्रदा यांच्या अटकेसाटी एसपींनी विशेष टीम गठीत केली आहे. या टीमने जयाप्रदा यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या दिल्ली ऑफिसपासून मुंबई आणि हैदराबाद येथे जावून अटक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. जयाप्रदा यांचा पत्ताच लागला नाही.
जयाप्रदा यांच्यावर नेमके आरोप काय?
जयाप्रदा यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना त्यांनी एका रस्त्याच उद्घाटन केलं. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपाप्रकरणी त्यांच्याविरोधात स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर दुसरं प्रकरण हे आचारसंहितेच्या काळात त्यांनी पिपलिया मिश्र गावात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. दोन्ही प्रकरणी रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टात सुनावणी सुरु आहे.