Jhund: नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार
'फँड्री', 'सैराट' (Sairat) यांसारख्या सिनेमांनी मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य आणलं. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित या सिनेमांनी केवळ सिनेसृष्टीतच नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यातही काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. याच सिनेमांमुळे एका 20 वर्षीय मुलाचं आयुष्य बदललं.
‘फँड्री’, ‘सैराट’ (Sairat) यांसारख्या सिनेमांनी मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य आणलं. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित या सिनेमांनी केवळ सिनेसृष्टीतच नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यातही काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. याच सिनेमांमुळे एका 20 वर्षीय मुलाचं आयुष्य बदललं. नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या निमित्ताने या मुलाने फेसबुकवर पोस्ट लिहित त्याच्या आयुष्यातील हा सर्वांत महत्त्वपूर्ण अनुभव सांगितला. प्रेम येलमलवार असं या मुलाचं नाव असून त्याने ‘झुंड’ चित्रपटात नागराज यांच्यासोबत काम केलं आहे. नागराज मंजुळेंच्या सिनेमांनी त्याचं आयुष्य कसं बदललं आणि झुंडच्या टीमसोबत काम करण्याची संधी कशी मिळाली, याविषयी त्याने फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘झुंड’ हा सिनेमा आज (4 मार्च) रोजी प्रदर्शित झाला असून यामध्ये अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे.
प्रेम येलमलवारची पोस्ट-
‘मी माझ्या ताईसोबत थिएटरमध्ये सैराट हा सिनेमा पाहिला होता आणि नागराज मंजुळेंच्या कामाशी माझी ओळख झाली. जेव्हा मी सिनेमा पाहून आलो, तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा मी ताईकडे बोलून दाखवली होती. कारण सैराट मला खूप आवडला होता. तो सिनेमा पाहून मी हरखून गेलो होतो. काही दिवसांनी मी फँड्री पाहिला आणि सरांचा जबरा फॅन झालो. मला फक्त त्यांना भेटण्याची इच्छा होती. पण कधी हा विचार केला नव्हता की ते नागपूरला शूटिंगसाठी येतील आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. मी मनापासून नागराज मंजुळे सरांचे आभार मानतो की त्यांनी एका 20 वर्षीय मुलाला दिग्दर्शन टीममध्ये जागा दिली आणि मला फिल्ममेकिंग शिकण्याची संधी दिली. मी तर कधी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकलो नसतो, मात्र ‘झुंड’मुळे मला जवळपास सर्व फिल्ममेकिंग प्रोसेस समजली. झुंड हा केवळ माझ्यासाठी सिनेमा नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे. विक्रांत पवार आणि कुटुब इनामदार यांच्यासोबत काम करून मला बरंच काही शिकायला मिळालं. आटपाट टीमचेही आभार, ज्यांनी मला खूप प्रेम आणि सन्मान दिला. भूषण मंजुळे, सरिता बागडे-मंजुळे, गणेश दादा यांच्यामुळे माझी प्रोजेक्टमध्ये एण्ट्री झाली. याच तिघांसोबत माझी सर्वांत आधी ओळख झाली होती. माझ्या ताईचेही आभार, जिने माझ्यातल्या फिल्मी किड्याला मरू दिलं नाही आणि सैराटच्या तिकिटासाठी पैसेसुद्धा दिले. कोणाचा या गोष्टीवर विश्वास असो वा नसो, पण मला शाहरुख सरांच्या एका डायलॉगवर पूर्ण विश्वास बसला. तो म्हणजे, ‘किसी चीज़ को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने की साज़िश में लग जाती है.’
‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली. नागपूरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं.
संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!