Hindi: “ते हिंदी भाषा का बोलतील?”; किच्चा सुदीप-अजय देवगणच्या वादावर सोनू निगमचा सवाल
हिंदी (Hindi) भाषेवरूनच अजय आणि आणि सुदीप यांच्यात ट्विटरवॉर झाला होता. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती की, 'तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत का डब करता?'
हिंदी भाषेवरून अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्यात झालेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) उडी घेतली. ‘राज्यघटनेत हिंदी (Hindi) भाषेचा उल्लेख राष्ट्रीय भाषा असा केलेला नाही’ असं त्याने म्हटलंय. त्याचप्रमाणे तमिळ ही जगातील सर्वांत जुनी भाषा असून त्यांनी हिंदी का बोलावं, असाही सवाल त्याने केला. हिंदी भाषेवरूनच अजय आणि आणि सुदीप यांच्यात ट्विटरवॉर झाला होता. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती की, ‘तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत का डब करता?’ हिंदी भाषेवरील या वादावर नंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांसह इतरही काही नेत्यांनी सुदीपला आपला पाठिंबा दर्शविला.
काय म्हणाला सोनू निगम?
“माझ्या माहितीनुसार भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषेचा उल्लेख राष्ट्रीय भाषा म्हणून केलेला नाही. हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, असं मी समजतो. पण आपल्याला माहीत आहे का की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. संस्कृत आणि तमिळ यांच्यात हा वाद आहे. लोक म्हणतात तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे”, अशी प्रतिक्रिया सोनू निगमने एका खासगी कार्यक्रमात दिली. पद्मश्री पुरस्कारप्राप्त सोनूने यावेळी भारत आणि भारतीयांच्या भाषांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांवरही टीका केली.
पहा व्हिडीओ-
Perfect response to Ajay Devgn by Sonu Nigam: Let’s not divide people further in this country, where is it written that Hindi is our national language? ? pic.twitter.com/hC9nHbXJHy
— Sushant Mehta (@SushantNMehta) May 2, 2022
“आपल्या देशात आधीच कमी समस्या आहेत का, की आपण आणखी समस्यांचा विचार करतोय? आपल्या शेजाऱ्यांकडे पहा आणि इथे आपण भाषेवरून भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. का? ते (तमिळ भाषिक) हिंदी का बोलतील”, असा सवाल त्याने केला. “लोकांना ज्या भाषेत बोलायचं आहे, त्यांना त्या भाषेत बोलू द्या. तुम्ही ही भाषा बोलली पाहिजे, ती भाषा बोलली पाहिजे असं म्हणत आपण का इतरांच्या मागे धावतोय? सोडून द्या तो विषय..” असंही तो पुढे म्हणाला.
लोकांना त्यांना सोयीस्कर असलेल्या भाषेत बोलण्याची मुभा दिली पाहिजे असं म्हणत असतानाच सोनूने आपल्या देशातील न्यायालयांचे निकाल हे इंग्रजीत दिले जातात याकडे लक्ष वेधलं. सोनू निगमचा हा व्हिडीओ ‘बीस्ट स्टुडिओज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत मेहता यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.