Satish Kaushik : सतिश कौशिक यांचा ‘हा’ सिनेमा ठरला शेवटचा; माजी संरक्षण मंत्र्याच्या भूमिकेत दिसणार
कंगना रनौत आणि अभिनेता अनुपम खेर यांचा राजकारणावर भाष्य करणारा एमर्जन्सी हा सिनेमा येत आहे. या सिनेमात सतिश कौशिक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते, माजी संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम यांची भूमिका साकारली आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतिश कौशिक यांचं काल गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरलीच. पण त्यांच्या निधनाने त्यांचे चाहत्यांनाही धक्का बसला. सतिश कौशिक यांनी शंभरहून अधिक सिनेमात काम केलं. त्यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्या. पण आपल्या अभिनयाच्या ताकदीने त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली. त्यांच्या काही भूमिका तर सिनेमातील मुख्य अभिनेत्यापेक्षाही सरस ठरल्या. तर पप्पू पेजर, कँलेंडर अशा काही व्यक्तीरेखा या तर त्यांची ओळखच बनल्या. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एका सिनेमात अत्यंत महत्त्वाची भूमिका मिळाली. पण हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. या सिनेमात त्यांनी एका प्रसिद्ध राजकारण्याची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला आहे.
कंगना रनौत आणि अभिनेता अनुपम खेर यांचा राजकारणावर भाष्य करणारा एमर्जन्सी हा सिनेमा येत आहे. या सिनेमात सतिश कौशिक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते, माजी संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमात सतिश कौशिक यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या स्पूर्ण फिल्मी करिअरमध्ये त्यांना पहिल्यांदाच अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. येत्या ऑक्टोबरपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कौशिक यांचा हा शेवटचा सिनेमा ठरला आहे. विशेष म्हणजे त्यांचे सर्वात जिवलग मित्र अनुपम खेर यांच्यासोबतचा त्यांचा हा शेवटचाच सिनेमा ठरला आहे.
काय आहे सिनेमा?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975-76मध्ये आणीबाणी लागू केली होती. त्यावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमात कौशिक यांनी बाबू जगजीवनराम यांची भूमिका साकारली आहे. जगजीवनराम हे काँग्रेस नेते होते. शिवाय ते स्वातंत्र्यसैनिकही होते. कंगना रनौतने काही महिन्यांपूर्वीच या सिनेमातील सतीश कौशिक यांच्या लूकचा फोटो शेअर केला होता.
View this post on Instagram
त्यावर कंगनाने एक कमेंट करून कौशिक यांच्या अभिनयाची तोंडभरून स्तुती केली होती. लास्ट बट नॉट द लिस्ट… प्रतिभेचे पावर हाऊस सतिश कौशिक यांना आणीबाणीच्या काळात जगजीवन राम यांच्या रुपात सादर केलं जात आहे. जगजीवन राम यांना बाबू जगजीवन राम म्हणूनही ओळखलं जातं. ते भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय राजकारणी होते, असं कंगनाने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
कंगनाचे मानले होते आभार
त्यावर कौशिक यांनीही इन्स्टाग्रामवरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कंगना रनौत हिच्या दिग्दर्शनात एमर्जन्सी हा सिनेमा होत आहे. या सिनेमात अत्यंत दयाळू आणि सामाजिक न्यायाचे योद्धा बाबू जगजीवनराम यांची भूमिका साकारण्यास मिळाली. त्याबद्दल आभार, असं कौशिक यांनी म्हटलं होतं.