Jhund Video: आधी आमिर खान आता धनुष; नागराजच्या ‘झुंड’वर साऊथ सुपस्टार म्हणतो ‘मास्टरपीस’
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी विविध सेलिब्रिटींनी प्रायव्हेट स्क्रिनिंगमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी विविध सेलिब्रिटींनी प्रायव्हेट स्क्रिनिंगमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आधी आमिर खानने नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाची स्तुती केली. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने (Dhanush) ‘झुंड’वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धनुषने नुकताच हा चित्रपट पाहिला असून त्यातील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने त्याचं मन जिंकल्याची भावना त्याने व्यक्त केली. “नागराज मंजुळेंचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे”, असं तो म्हणाला. ‘झुंड’ हा नागराज यांचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. चित्रपट बनवताना त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आल्या, त्यामुळे प्रदर्शनही पुढे ढकलावं लागलं. अखेर टी सीरिजच्या भूषण कुमार यांनी कथा ऐकल्यानंतर चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं.
काय म्हणाला धनुष?
“कुठून सुरुवात करू ते समजत नाहीये. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी हजार शब्द बोलू शकतो, की हे अप्रतिम आहे, ते खूप छान आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जाते. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हा चित्रपट पाहिल्याचा, ती जादू अनुभवल्या मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.
‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सैराट’मधील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’मधील ‘जब्या’ अर्थात सोमनाथ अवघडे यानेही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून बिग बी विजय यांच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या: झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी