‘गदर-2’ची छप्परफाड कमाई, पण सनी देओल यांच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव; काय आहे प्रकरण?
गदर-2च्या छप्परफाड कमाईमुळे अभिनेते सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या सिनेमाच्या कमाईची चर्चा सुरू असतानाच सनी देओल यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : एकीकडे अभिनेते आणि खासदार सनी देओल यांच्या गदर-2 ची प्रचंड चर्चा सुरू आहे. गदर-2 ने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. अवघ्या नऊ दिवसात विक्रमी कमाई करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत गदर-2 चा समावेश झाला आहे. त्यामुळे सनी देओल यांची बॉलिवूडमध्ये दमदारपणे सेकंड इनिंग सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे अभिनेता सनी देओल यांना धक्का देणारी बातमी आहे. सनी देओल यांच्या मुंबईतील सर्वात सुंदर बंगल्याचा लिलाव होणार आहे.
सनी देओल यांच्यावर बँकेचं एक मोठं कर्ज आहे. त्याची फेड झाली नाही. त्यामुळे बँकेने सनी देओल यांची मुंबईतील मालमत्ता लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची जाहिरातही बँकेने काढली आहे. एकीकडे यशाची चव चाखत असतानाच दुसरीकडे मालमत्ता लिलाव होण्याचं संकटही सनी देओल यांच्या डोक्यावर ओढवलं आहे.
काय आहे प्रकरण?
बँक ऑफ बडोदाने सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलावाची जाहिरात दिली आहे. सनी देओल यांनी बँकेकडून मोठं कर्ज घेतलं होतं. या कर्जाच्या बदल्यात त्यांनी जुहू येथील त्यांचा सनी विला नावाचा बंगला कंपनीकडे तारण ठेवला होता. त्याबदल्यात सनी देओल यांना 56 कोटी रुपये चुकवायचे होते. ते अजूनही त्यांनी फेडलेले नाहीत.
हे कर्ज आणि त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी बँकेने बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरातीनुसार या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. लिलावासाठी मालमत्तेची रिझर्व्ह प्राईस 51.43 कोटी ठेवण्यात आली आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे सनी देओल यांचा मोठ्या पडद्यावरील करिष्मा अजूनही कायम आहे. त्यांच्या गदर 2 या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने प्रचंड कमाई केली आहे. प्रत्येक खेळ हाऊसफूल्ल जात आहे. आठच दिवसात या सिनेमाने 300 कोटीचा गल्ला जमवला आहे. शनिवारी 9 व्या दिवशी या सिनेमाने 335 कोटीचा पल्ला गाठला होता. लवकरच हा सिनेमा 400 कोटीचा पल्ला गाठणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गदर-2ची कमाई पाहता हा सिनेमा शाहरुख खानच्या पठानलाही कमाईच्या बाबतीत मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुखचा पठान हा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील एकमेव सिनेमा ठरला आहे.