TV9 Special Report: ‘भाईजान’साठी पोलिसांचा खडा पहारा, सलमान इतका महत्त्वाचा का? एकूण किती हजार कोटींचा मामला?
या सर्व घडामोडी आणि मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, डीसीपी मंजुनाथ शिंगे, स्थानिक वांद्रे पोलिसांचं पथकसुद्धा सोमवारी सलमानच्या घरी पोहोचलं.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 5 जून रोजी सलमान आणि सलीम यांना धमकीची एक चिठ्ठी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या गृह खात्याने त्यांची सुरक्षा वाढवून त्यासंदर्भात अधिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने या हत्येची कबुली दिली. याच लॉरेन्स बिश्नोईने 2018 मध्ये सलमानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सर्व घडामोडी आणि मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, डीसीपी मंजुनाथ शिंगे, स्थानिक वांद्रे पोलिसांचं पथकसुद्धा सोमवारी सलमानच्या घरी पोहोचलं. बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याचं स्टारडम, त्याची लोकप्रियता पाहता डोळ्यात तेल घालून पोलिसांना सुरक्षेबाबत सजग राहावं लागणार आहे. सलमानची संपत्ती, त्याचं करिअर, त्याला मिळणारं मानधन यांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट:
3000 कोटी संपत्तीचा मालक
अब्दुल राशिद सलिम सलमान खानचा जन्म डिसेंबर 1965 मध्ये झाला असून त्याने आपल्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये 80हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सलमान हा बॉलिवूडमधला तिसरा सर्वांत श्रीमंत अभिनेता आहे. काही रिपोर्ट्सनुसार 56 वर्षीय ‘दबंग’ खान हा त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय चित्रपटाच्या नफ्यातील 70 टक्के भाग हा सलमान स्वत:कडे ठेवतो. त्याची एकूण संपत्ती ही तब्बल 3000 कोटी इतकी आहे. नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. ॲक्शन, रोमँटिक, फॅमिली ड्रामा.. विषय कोणताही असो, ज्या चित्रपटात सलमान खान असेल, तो हिट ठरणारच असा निर्मात्यांचा विश्वास असतो. सलमान स्वत: एक निर्मातासुद्धा आहे.
करिअर
1988 मध्ये ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारून त्याने करिअरची सुरुवात केली. मात्र ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. ‘करण अर्जुन’, ‘बिवी नंबर 1’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’ यांसारख्या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 2000 मध्ये त्याचा करिअर ग्राफ काहीसा खाली आला, मात्र तेव्हाच त्याला वाँटेडची ऑफर मिळाली. वाँटेड, दबंग, एक था टायगर, किक, सुलतान या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले.
पहा फोटो-
View this post on Instagram
सलमानचं मानधन
सलमान मोठ्या पडद्यावर जितका लोकप्रिय आहे, तितकीच छोट्या पडद्यावर त्याची क्रेझ आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं तो सूत्रसंचालन करतो आणि या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याला तगडं मानधन मिळतं. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’च्या तेराव्या सिझनसाठी त्याने तब्बल 200 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारलं होतं. तर जाहिरातीच्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी तो 3.5 कोटी रुपये मानधन घेतो. थम्स अप, कोका कोला, माऊंटन ड्यू, भारत पे, रिअलमी, पीएनजी ज्वेलर्स, अॅपी फिज, इमामी यांसारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिराती तो करतो. बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकी एक, सर्वांत लोकप्रिय असूनदेखील सलमान हा त्याच्या नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. ‘बिईंग ह्युमन’ या त्याच्या संस्थेद्वारे गरजूंना विविध माध्यमांतून मदत केली जाते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बिईंग ह्युमन या संस्थेची ब्रँड व्हॅल्यू ही जवळपास 235 कोटी रुपये आहे.
सलमान खानची संपत्ती-
मुंबईतील वांद्रे याठिकाणी समुद्रकिनारी सलमानचा तीन मजली बंगला आहे. ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ असं त्याचं नाव असून अनेकांसाठी हा बंगला म्हणजे जणू पर्यटन स्थळच आहे. मुंबईत पहिल्यांदा आलेला पर्यटक आणि सलमानचा चाहता या बंगल्याबाहेर आपला फोटो किंवा सेल्फी काढल्याशिवाय राहणार नाही. ‘डीएनए’नं दिलेल्या एका वृत्तानुसार, त्याच्या या बंगल्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. याशिवाय पनवेलमध्ये जवळपास 150 एकर परिसरात सलमानचा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये जिम, स्विमिंग पूल आणि इतर सुविधाही उपलब्ध आहेत. लॉकडाउनदरम्यान सलमान त्याच्या कुटुंबीयांसोबत आणि बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसोबत याच फार्महाऊसमध्ये राहत होता. याशिवाय गोराईमध्येही त्याचा 5 बीएचके बीच होम आहे. दुबईतील बुर्ज खलिफाजवळच सलमानचं आणखी घर आहे.
पहा फोटो-
View this post on Instagram
गेल्या वर्षी सलमानचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘टायगर 3’ हे त्याचे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आहेत. सलमान खान आजवर विविध वादात अडकला असला तरी त्याचा त्याच्या स्टारडमवर तसूभरही फरक पडला नाही. ‘गॉडफादर’, ‘भाईजान’, ‘दबंग’ अशा विविध नावांनी तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.