मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बाॅलिवूड चित्रपट निर्माते आणि कलाकारांसोबत महत्वाची बैठक
विशेष म्हणजे या बैठकीमध्ये बाॅलिवूडमधील कोणते कलाकार आणि चित्रपट निर्माते सहभागी होऊ शकतात, याची एक यादीही पुढे आलीये.
मुंबई : कालच अक्षय कुमार याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. आज तर बाॅलिवूडमधील अनेक कलाकार, चित्रपट निर्माता, आणि काही गायक यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मुंबईमधील ताज हाॅटेलमध्ये एक बैठक आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये बाॅलिवूडमधील कोणते कलाकार आणि चित्रपट निर्माते सहभागी होऊ शकतात, याची एक यादीही पुढे आलीये. यामध्ये अनेक नामवंत चित्रपट निर्मात्यांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटीबाबत ही बैठक असल्याचे सांगितले जातंय. अनेक चित्रपट निर्माते आणि बाॅलिवूडचे कलाकार हे उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटीची आतुरतेने वाट पाहात असल्याचे सांगितले जातंय.
सुभाष घई, विनोद बच्चन, मधुर भांडारकर, अनिल शर्मा, काजल अग्रवाल, कैलाश खेर, चंद्रप्रकाश द्विवेदी, मुकेश छाबरा, दिनो मोरया, बोनी कपूर, नींदम बाजवा, मनोज जोशी, राहुल मित्रा, इंद्र कुमार, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे सहभागी होऊ शकतात.
मुंबईमधील फिल्मसिटी योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जात असल्याचा आरोप राज्यातील नेते करताना दिसत आहेत. मात्र, यावर योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते की, मुंबईमधील फिल्मसिटी इथेच राहणार आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळी फिल्मसिटी करत आहोत.
मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे. यावर स्वत: योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच योगी यांनी म्हटले की, मुंबईतून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही विचार अजिबात नाहीये.