Gadar 2 पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बाऊन्सर्सकडून मारहाण; थिएटरमधील जोरदार हंगामा
'गदर 2' हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बाऊन्सर्सनी मारहाण केली आहे. यानंतर थिएटरमध्ये बराच गोंधळ झाला. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कानपूरमधील जुही इथल्या साऊथ एक्समधील असल्याचं कळतंय.
कानपूर | 17 ऑगस्ट 2023 : देशभरातील थिएटर्समध्ये सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या सातव्या दिवशीही अनेक शोज हाऊसफुल्ल आहेत. अशातच उत्तरप्रदेशमधील कानपूर इथल्या एका थिएटरमधील गोंधळाचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बाऊन्सर्सनी मारहाण केली आहे. यानंतर थिएटरमध्ये बराच गोंधळ झाला. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कानपूरमधील जुही इथल्या साऊथ एक्समधील असल्याचं कळतंय. थिएटरमध्ये एसी चालू नव्हता म्हणून काही लोक त्याची तक्रार करण्यासाठी आयोजकांकडे गेले. तिथे दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर बाऊन्सर्सनी लोकांना मारहाण केली.
बाऊन्सर्सनी मारहाण केल्यानंतर थिएटरमध्ये एकच हंगामा झाला आणि दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ज्या दोन लोकांना बाऊन्सर्सनी मारहाण केली, ते कानपूरमधील प्रसिद्ध दाल मिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांची मुलं असल्याचं कळतंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दाल मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिथिलेश गुप्ता म्हणाले, “बुधवारी रात्री मी माझ्या पत्नी आणि दोन मुलांसोबत गदर 2 हा चित्रपट पहायला गेलो होतो. थिएटरमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता आणि एसीसुद्धा चालू नव्हतं. याचीच तक्रार करण्यासाठी माझी मुलं आयोजकांकडे गेले होते.”
“तक्रार केल्यानंतर थोड्या वेळात एसी सुरू होईल असं आम्हाला सांगितलं गेलं. मात्र बऱ्याच वेळानंतरही एसी सुरू न केल्याने माझी मुलं पुन्हा तक्रार करायला गेली. तेव्हा बाऊन्सर्सनी त्यांना बाहेर बोलावून मारहाण केली”, असं त्यांनी पुढे सांगितलं. कानपूरच्या या थिएटरमध्ये झालेली मारहाणीची ही घटना पहिलीच नाही. याआधीही याच थिएटरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
पहा व्हिडीओ
A spectator who had gone to watch the film Gadar-2 was assaulted in Kanpur. In the PVR Cinema Hall of South Ex Mall, when the young man lodged his complaint about the malfunctioning of the AC, the bouncers beat him up. Watch this video to know more.@DMKanpur @kanpurnagarpol pic.twitter.com/9i5hbf2i69
— विवेक मिश्रा (@VIVEKMIS1) August 17, 2023
‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांनी भूमिका साकारल्या आहेत.