अनंत अंबानीच्या विवाहस्थळी ‘या’ कारणामुळे दोघांना अटक; गुन्हा दाखल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहस्थळावरून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी एक विरारमधील व्यापारी असून दुसरा आंध्र प्रदेशमधील युट्यूबर आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहस्थळी म्हणजेच वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’मध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. आरोपी वेगवेगळ्या दरवाज्यातून आत शिरले. पण त्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’मध्ये दोन वर्षांपासून कार्यरत असलेले आणि 5 जुलैपासून लग्नाच्या ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा अधिकारी बलरामसिंग लाल यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली. त्यात दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे जिओ वर्ल्ड सेंटरच्या पहिल्या मजल्यावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना त्यांना आढळून आली होती. लाल यांनी त्या व्यक्तीला सुरक्षा प्रभारी मनिष श्यामलेती यांच्याकडे आणलं आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांच्या ताब्यात दिलं.
बिझनेसमनला अटक
लुकमान मोहम्मद शफी शेख (28 वर्षे) असं या व्यक्तीचं नाव असून तो विरारमधला व्यापारी असल्याचं समजतंय. गेट क्रमांक 10 मार्गे तो बेकायदेशीरपणे विवाहस्थळी दाखल झाला होता. लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना प्रवेशासाठी विशेष पास जारी करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. चौकशीदरम्यान शेखने कबुल केलं की अनंत-राधिकाच्या लग्नाविषयी असलेल्या कुतुहलापोटी तो कार्यक्रमस्थळी बेकायदेशीररित्या पोहोचला होता.
बेकायदेशीरपणे पोहोचला युट्यूबर
दुसऱ्या घटनेत जिओ वर्ल्ड सेंटरच्या पॅव्हेलियन क्रमांक 1 इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून विचारपूस केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या व्यक्तीचं नाव व्यंकटेश अलुरी असून तो 26 वर्षांचा आहे. व्यंकटेश हा आंध्र प्रदेशातील युट्यूबर असल्याचं कळतंय. शुक्रवारी सकाळी तो गेट क्रमांक 23 वर दिसला होता. पण लग्नसमारंभासाठी वैध पास नसल्यामुळे त्याला तिथून जाण्यास सांगण्यात आलं होतं. तरीसुद्धा तो गेट क्रमांक 19 च्या दिशेने निघाला आणि तिथून बेकायदेशीरपणे कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यात यशस्वी झाला. काही वेळानंतर त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. आपल्या युट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ शूट करण्याची इच्छा होती, म्हणून आत शिरल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
पोलिसांच्या सुरक्षेसोबतच अनेक व्हीव्हीआयपींची अपेक्षित उपस्थिती असल्याने विवाहस्थळी कडक खासगी सुरक्षा ठेवण्यात आली होती. याशिवाय या व्हीव्हीआयपींच्या वाहतुकीसाठी त्या परिसरातील इतर मार्गातील वाहतूक वळवण्यात आली होती.