फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का? प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरातील 4 मजल्यांवर फक्त गाड्यांचं कलेक्शन
फोटोतील या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का? आज हा मुलगा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये परफेक्ट मसालापटांसाठी तो ओळखला जातो. या दिग्दर्शकाच्या 10 मजली घरातील चार मजले हे फक्त गाड्यांच्या पार्किंगसाठी आहेत.
मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : आईच्या कुशीत असलेल्या या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का? हा चिमुकला आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात. मात्र या दिग्दर्शकाने शून्यातून सुरुवात केली होती. त्याचा पहिला पगार फक्त 35 रुपये इतकाच होता. 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. पगारासाठी मिळणारे पैसे अनेकदा खर्चासाठी कमी पडायचे. अशावेळी हा दिग्दर्शक उन्हातान्हात मालाड ते अंधेरी चालत जायचा. आज हाच दिग्दर्शक बॉलिवूडमधील सर्वांत मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे.
फोटोतील या चिमुकल्याला तुम्ही अद्याप ओळखला नसाल तर हा दिग्दर्शक रोहित शेट्टी आहे. रोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला. त्याने गोलमाल आणि सिंघमसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. रोहितचे वडील एम. बी. शेट्टी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन होते. मात्र रोहित लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमीन’ या चित्रपटात रोहितने पहिल्यांदा अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं.
View this post on Instagram
रोहित शेट्टीचे चित्रपट ॲक्शन सीन्ससाठी विशेष ओळखले जातात. हवेत उडणारे कार, ट्रक आणि हेलीकॉप्टर ही त्यांच्या चित्रपटांची ओळख आहे. सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस, दिलवाले, सिम्बा यांसारख्या त्याच्या चित्रपटांमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स पहायला मिळाले. त्याच्या गोलमाल चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटांशिवाय गेल्या काही वर्षांपासून रोहित ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे.
रोहित शेट्टीला गाड्यांची फार आवड आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये जेवढ्या गाड्या दिसतात, तेवढंच कार कलेक्शन त्याच्याकडे आहे. रोहित शेट्टीच्या 10 मजली टॉवरमध्ये 4 मजले फक्त गाड्यांच्या पार्किंगसाठी आहेत. यावरूनच त्याचं कारप्रेम सहज लक्षात येतंय. त्याच्याकडे महिंद्रा स्कॉर्पियो, रेंज रोव्हर स्पोर्ट, लँबॉर्गिनी उरुस, फोर्ड मस्टंग जीटी, मर्सिडीज एएमजी जी 63, मसेरती ग्रान यांसारख्या आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे.