ना बॉलिवूड ना साऊथ; बॉक्स ऑफिसवर ‘या’ पंजाबी चित्रपटाचा धुमाकूळ, 4 दिवसांत बजेटपेक्षा अधिक कमाई
'कॅरी ऑन जट्टा 3'मध्ये पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लों आणि गुरप्रीत घुग्गी यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्मीप कांगने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिग्दर्शक सलमान खानने चित्रपटाचं कौतुक केलं.
मुंबई : बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येईल, याचा काही नेम नसतो. कारण अनेकदा मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतो. तर कमी बजेटच्या चित्रपटांची दणक्यात कमाई होते. यामागचं कारण म्हणजे त्या चित्रपटाचा कंटेट. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये कमी बजेटच्या चित्रपटांनी चांगल्या कथानकाच्या जोरावर दमदार कमाई केली. याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसुद्धा अपवाद नाही. मात्र सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड किंवा साऊथ नव्हे तर एका पंजाबी चित्रपटाने कमाल केली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘कॅरी ऑन जट्टा 3’. गुरुवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अवघ्या चार दिवसांत त्याने बजेटपेक्षा अधिक कमाईचा आकडा गाठला आहे.
‘कॅरी ऑन जट्टा 3’ हा चित्रपट अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 19.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई 4.55 कोटी रुपयांची झाली. तर दुसऱ्या दिवशी 3.85 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाचा व्यवसाय 5.10 कोटी रुपयांचा झाला. चौथ्या दिवशी या पंजाबी चित्रपटाने सर्वाधिक 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या हिशोबाने ‘कॅरी ऑन जट्टा 3’ने गेल्या चार दिवसांत 19.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट येत्या दिवसांत आणखी दमदार कमाई करू शकतो.
‘कॅरी ऑन जट्टा 3’मध्ये पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लों आणि गुरप्रीत घुग्गी यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्मीप कांगने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिग्दर्शक सलमान खानने चित्रपटाचं कौतुक केलं.
एकीकडे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची दमदार कमाई सुरू असतानाच दुसरीकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिव सेना हिंदच्या युवा समितीचे अध्यक्ष इशांत शर्मा आणि पंजाब शिव सेनाचे (टकसाली) अध्यक्ष सुनील कुमार बंटी यांनी जलंधर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “या चित्रपटात असा एक सीन आहे, ज्यामुळे ब्राह्मणांचा अपमान केला आहे”, असं त्यांनी म्हटलंय.