Chandrayaan 3 | ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगनंतर ‘मिशन मंगल’ दिग्दर्शकाची मोठी घोषणा; म्हणाले..
मंगळ ग्रहावरील देशाच्या मोहीमेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, निती मेनन, शरमन जोशी यांसारखे कलाकार झळकले होते.
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान 3 च्या ‘विक्रम’ लँडरने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं. या यशस्वी लँडिंगसह भारताने नवा इतिहास घडवला. इस्रोने जाहीर केलेल्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाचा सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. एकीकडे संपूर्ण देशभरात ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद साजरा झाला तर दुसरीकडे या मोहीमेवर चित्रपट बनवणारे पुढे आले. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी ‘चांद्रयान 3’च्या यशाला मोठ्या पडद्यावर दाखवण्याची घोषणा केली आहे.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जगन शक्ती यांनी सांगितलं की, ते या संधीला हातातून जाऊ देणार नाहीत. यासोबत त्यांनी असंही सांगितलं की ‘चांद्रयान 3’ मोहीमेवर बनणाऱ्या चित्रपटात ‘मिशन मंगल’मधील कलाकारांचीच वर्णी लागू शकते. मिशन मंगल या चित्रपटात अक्षय कुमारसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘चांद्रयान 3’वरील चित्रपटातसुद्धा अक्षय मुख्य भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.
मंगळ ग्रहावरील देशाच्या मोहीमेवर आधारित ‘मिशन मंगल’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, निती मेनन, शरमन जोशी यांसारखे कलाकार झळकले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला होता. देशभरात या चित्रपटाने 290 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे या चित्रपटाचं यश हे कारण असो किंवा ‘चांद्रयान 3’ मोहिमेबद्दल असलेली क्रेझ.. दिग्दर्शक जगन शक्ती यांना त्यावर चित्रपट बनवण्याची संधी गमवायची नाही, हे मात्र निश्चित आहे.
जगन शक्ती यांनी सांगितलं की त्यांची मोठी बहीण इस्रोमध्ये सीनिअर साइन्टिस्ट आहे. त्यामुळे ‘चांद्रयान 3’बाबत ते बहिणीकडून सर्व माहिती घेत आहेत. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर लगेचच त्यावरील चित्रपटाबाबत विचार सुरू केल्याचं ते म्हणाले. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या वेळीही त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती.