चित्रपटाचं तिकिट असूनही गरीब कुटुंबाला नाकारला थिएटरमध्ये प्रवेश; अखेर मालकाने दिलं स्पष्टीकरण
गरीब असल्यामुळे त्यांना थिएटरमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, असं म्हटलं जातंय. हा भेदभाव अयोग्य असून संबंधित थिएटरचा लायसन्स रद्द केला पाहिजे, अशी मागणी संतप्त नेटकरी करत आहेत.
चेन्नई : गुरुवारी 30 मार्च रोजी ‘पतू थाला’ हा तमिळ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मात्र चेन्नईतील एका कुटुंबासाठी हा चित्रपट कटू अनुभव देऊन गेला. सोशल मीडियावर सध्या त्यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपटाचं तिकिट विकत घेऊनही एका गरीब कुटुंबीयांना थिएटरमध्ये आत प्रवेश दिला नाही. या घटनेवरून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. चेन्नईमधील रोहिणी सिल्वर स्क्रीनबाहेर उभे असलेले हे कुटुंबीय आत प्रवेश देण्याची विनंती करताना या व्हिडीओत दिसत आहेत.
चित्रपटाचं तिकिट विकत घेतल्यानंतरही त्यांना थिएटरमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. ते वारंवार तिकिट दाखवत होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या व्हिडीओत आजूबाजूला उभे असलेले इतरही काही लोक त्यांना आत प्रवेश देण्याची विनंती करताना दिसत आहेत. मात्र थिएटरमधील कर्मचारी त्यांना तिथून जाण्यास सांगत आहेत. गरीब असल्यामुळे त्यांना थिएटरमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, असं म्हटलं जातंय. हा भेदभाव अयोग्य असून संबंधित थिएटरचा लायसन्स रद्द केला पाहिजे, अशी मागणी संतप्त नेटकरी करत आहेत.
The poor were not given entry in the theater even after buying the tickets. pic.twitter.com/lTEoBpjxgO
— The Dalit Voice (@ambedkariteIND) March 30, 2023
पाहता पाहता रोहिणी थिएटरविरोधात ट्विटरवर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. नेटकऱ्यांकडून हा विरोध पाहता अखेर थिएटरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. संबंधित कुटुंबीयांसोबत 12 वर्षांपेक्षाही लहान मुलं होती, म्हणून त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला, असं त्यांनी म्हटलंय. कारण थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळालं होतं. त्यानुसार 12 वर्षांखालील लहान मुलांना हा चित्रपट पाहता येणार नव्हता.
— Rohini SilverScreens (@RohiniSilverScr) March 30, 2023
‘पतू थाला या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सकाळी थिएटरच्या परिसरात जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्याची आम्ही दखल घेतली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी काही जणांनी त्यांच्या मुलांसह थिएटरमध्ये प्रवेश मागितला होता. त्यांच्याकडे योग्य तिकिटंही होतं. मात्र सेन्सॉर बोर्डाने पतू थाला या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे 12 वर्षांखालील मुलांना कायद्यानुसार U/A प्रमाणित असलेला कोणताही चित्रपट पाहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी या आधारावरच 2,6,8 आणि 10 वयोगटातील मुलांसह आलेल्या कुटुंबाला प्रवेश नाकारला होता’, असं थिएटरकडून स्पष्ट करण्यात आलं.
“थिएटरबाहेर जमलेल्या प्रेक्षकांनी परिस्थितीला पूर्णपणे समजून न घेता वाद निर्माण केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी आम्ही त्या कुटुंबाला वेळेवर चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश दिला होता”, असंही त्यांनी म्हटलं. याचसोबत त्यांनी कुटुंबीयांचा चित्रपट पाहतानाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला.