शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या महिनाभरात अनेक विक्रम मोडले आहेत. आता शिवजयंतीच्या एक दिवस आधीच या चित्रपटाने जगभरात आपला डंका वाजवला आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिना उलटून गेला आहे. तरीही पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाल कामगिरी पहायला मिळतेय. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहे. आता शिवजयंतीच्या एक दिवस आधीच या चित्रपटाने जगभरात नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा जगभरात डंका वाजतोय. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची आणि रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना यामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत आहे.
‘छावा’ने आता जगभरात कमाईचा 750 कोटींचा आकडा पार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 30 दिवसांत या चित्रपटाने एकूण 750.5 कोटी रुपये कमावले होते. तर 31 व्या दिवशी ‘छावा’ने भारतात 8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंतच्या कमाईचा आकडा हा 758.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाच्या दमदार कलेक्शनने थलायवा रजनीकांत यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर वर्ल्डवाइड दहावी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड होता. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘2.0’ या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 744.78 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हा आकडा ‘छावा’ने पार केला असून आता विकी कौशलचा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दहावा चित्रपट ठरला आहे.




View this post on Instagram
याआधी ‘छावा’ने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला होता. हा चित्रपट विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. तर रश्मिकाच्या करिअरमधील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तिचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पहिल्या स्थानी आहे. ‘छावा’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’चाही विक्रम मोडला आहे. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाने 31 दिवसांत भारतात 562.65 कोटी रुपये कमावले आहेत. त्यापैकी हिंदी भाषेतील कमाई 548.7 कोटींवर पोहोचली आहे. तर तेलुगू व्हर्जनने 13.95 कोटी रुपये कमावले आहेत.
तिसाव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘छावा’ने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला ‘छावा’ आणि ‘पुष्पा 2: द रुल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होते. मात्र अल्लू अर्जुनने ‘छावा’च्या निर्मात्यांना फोन करून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख 6 डिसेंबरवरून 14 फेब्रुवारी करण्यात आली.