‘अवघ्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख कार्टं म्हणून करणारे..’; चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
चिन्मय मांडलेकरच्या मुलाला नावावरून केलं जातंय ट्रोल; अखेर पत्नीने दिलं चोख उत्तर
मुंबई: ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटींना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगचा, नेटकऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. अनेकदा सेलिब्रिटींच्या मुलांनाही विनाकारण लक्ष्य केलं जातं. त्याविरोधात आता अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे नेहाने तिच्या 9 वर्षांच्या मुलाला विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
चिन्मय आणि नेहा मांडलेकर यांच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असं आहे. याच नावावरून नेटकरी नकारात्मक कमेंट्स करत आहेत. या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर करत नेहाने चोख उत्तर दिलं आहे.
नेहा मांडलेकरची पोस्ट-
‘प्रिय ट्रोलर्स, याचा आता कंटाळा आलाय. 9 वर्षांच्या मुलाला तुम्ही अजून कधीपर्यंत लक्ष्य करणार आहात? दरवेळी त्याच्या वडिलांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होत असेल तेव्हा? जहांगीर रतनजी दादाभॉई टाटा हे देशद्रोही नव्हते. या महामानवाने या देशासाठी जे काही केलं, ते अनन्यसाधारण आहे. त्यांच्यावरून आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. पण हे सर्व मी कोणाला सांगतेय? त्यांना हे आधीच माहीत नाही का? द्वेषाने आंधळे झालेले लोक कशावरही त्यांचा रागा बाहेर काढण्यासाठी सबब शोधतात’, अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना फटकारलं.
View this post on Instagram
‘संस्कार..संस्कृती नेमकं काय असतात? अवघ्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख कार्टं म्हणून करणारे संस्कार असतात? त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसं आहोत. माझं संगोपन आणि मूल्ये अशा विनाचेहऱ्याच्या लोकांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करते. मी हे आणखी सहन करणार नाही’, असं त्यांनी पुढे लिहिलं.
नेहाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा ट्रोलर्सना अजिबात महत्त्व देऊ नका, असा सल्लाही काही नेटकऱ्यांनी नेहाला दिला.