गरोदर असताना अभिनेत्रीच्या पतीचं झालं होतं निधन; म्हणाली “लोकांच्या टोमण्यांमुळे जगणं विसरली”
पतीच्या निधनानंतर लोकांच्या टोमण्यांबद्दल व्यक्त झाली अभिनेत्री; मोकळेपणे हसायलाही वाटायची भीती
हैदराबाद: दाक्षिणात्य अभिनेत्री मेघना राजने एप्रिल 2018 मध्ये अभिनेता चिरंजीवी सरजाशी लग्न केलं होतं. मेघना आणि चिरंजीवी यांनी लग्नाच्या आधी दहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. मात्र 7 जून 2020 रोजी चिरंजीवीने या जगाचा निरोप घेतला. चिरंजीवीच्या निधनानंतर मेघनालाच सर्वकाही करावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर अशा कठीण काळात तिला लोकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मेघना म्हणाली, त्यावेळी हसायलाही भीती वाटायची.
39 वर्षीय चिरंजीवीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यावेळी मेघना गरोदर होती. एका मुलाखतीत मेघनाने सांगितलं की त्यावेळी ती पूर्णपणे एकटी पडली होती. अशा काळात लोकांच्या जजमेंट्सचा सामना करणं किती त्रासदायक असतं, हेदेखील तिने सांगितलं. प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले द्यायचा, असं ती म्हणाली.
“अनेकजण माझ्याजवळ येऊन वेगवेगळं काहीतरी सांगायचे. त्यांच्यासारखं मीसुद्धा या दु:खातून स्वत:ला लवकरात लवकर सावरावं, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र मी त्यांच्यासारखी नाही. विधवा महिला जशा पद्धतीने राहतात किंवा वागतात, मी तशीच राहावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र मी तशी नाहीये”, असं मेघना म्हणाली.
View this post on Instagram
“मी जणू हसणंच विसरून गेले होते. कारण जरा जरी हसले तरी लोक मला जज करू लागायचे. पतीच्या निधनानंतरही ही खूश कशी काय आहे, असं लोकांना वाटायचं”, असं तिने सांगितलं. अशा अनेक घटना होत्या, जेव्हा तिला मोकळेपणे हसायचं होतं. मात्र लोक काय म्हणतील या भीतीपोटी ती मनमोकळेपणाने जगू शकत नव्हती.
“या प्रवासात मला असे अनेक स्वार्थी लोकही भेटले आहेत. ज्यांनी असंही म्हटलं होतं की सहवेदना व्यक्त करू नका, त्यांच्याकडे सर्वकाही आहे. ठीक आहे. माझ्याकडे सर्वकाही आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आहे. मी कम्फर्टेबल आयुष्य जगू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की मी माणूस नाही. माझं नातं खोटं होतं का? मला दु:ख होत नाही का”, असा सवाल मेघनाने टीकाकारांना केला.