सर्व चॅट्स, स्क्रीनशॉट्स उघड करेन.. सुकेशची जॅकलीन फर्नांडिसला धमकी
तब्बल 200 कोटी खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आल्यापासून दर महिन्याला तिच्याशी निगडीत नवीन अपडेट समोर येत आहे. दिल्ली पोलिसांसोबतच इकोनॉमिक ऑफिस सेलचीही या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर तीक्ष्ण नजर आहे.
मुंबई : 22 डिसेंबर 2023 | तब्बल 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर निशाणा साधला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचीही चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात सुकेशने मला गोवलं, असं म्हणत तिने आरोप मागे घेण्याची विनंती दिल्ली हायकोर्टात केली. आता जॅकलीनच्या आरोपांना प्रतिक्रिया देताना सुकेशने थेट तिला धमकी दिली आहे. जॅकलीनविरोधातील सर्व न पाहिलेले पुरावे समोर आणण्याची धमकी त्याने दिली आहे. याप्रकरणी चौकशीत पक्षपात झाला असून संबंधित व्यक्तीला बचावण्याचा मी प्रयत्न करत होतो, असंही त्याने म्हटलंय.
सुकेशच्या धमक्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी जॅकलीनने दिल्ली कोर्टात धाव घेतली. इतकंच नव्हे तर सुकेशने तिला त्याच्या जाळ्यात अडकवल्याचं कारण देत आपण निष्पाप बळी ठरल्याचं तिने म्हटलंय. तिच्याविरोधातील खटला रद्द करण्याची मागणी करण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर सुकेशने नवीन पत्र जारी केलं आहे. या पत्रात त्याने जॅकलीनचं नाव न घेता संबंधित व्यक्तीविरोधातील सर्व पुरावे, चॅट्स, स्क्रीनशॉट्स, रेकॉर्डिंग्स उघड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर त्या व्यक्तीने मलाच दोषी ठरवलं असेल तर त्या व्यक्तीचं सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही’, असं सुकेशने पत्रात म्हटलंय.
संबंधित व्यक्तीचे परदेशातील सर्व आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक उघड करेन, जे मी याआधी त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी गुपित ठेवलं होतं, असा इशारा सुकेशने दिला आहे. ती इतर सहकलाकारांपेक्षा वरचढ ठरावी आणि तिचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी मी काही दशलक्ष डॉलर्स खर्च केले. त्यामुळे या सर्व गोष्टींचे पुरावे मी देऊ शकतो. जगाला सत्य समजलं पाहिजे, असंही त्याने स्पष्ट केलंय.
‘तुम्ही एखाद्याचं रक्षण करता, त्याला वाचवता आणि तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसते. हे पाहून मला धक्का बसला. त्यांना आता असं वाटतंय की ते सुरक्षित आहेत. स्वत:च पीडित असल्यासारखं दाखवत आहेत. दोषारोपाचे खेळ सुरू आहेत. ती व्यक्ती आता माझ्याकडे बोट दाखवून म्हणतेय की हाच सैतान आहे, हाच वाईट माणूस आहे. पण अनुभूती एखाद्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्ही कोणालाही तुमच्यावर वार करू देऊ शकत नाही किंवा कमी लेखू देऊ शकत नाही. तुम्हाला कोणीच गृहित धरू शकत नाही. ते जे करत आहेत, ते चुकीचं असल्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे’, असं सुकेशने त्याच्या पत्रात लिहिलंय.